हरिहरेश्वरची ‘कुटुंबे’वत्सल खाद्यसफर…

IMG_20170625_174302587_HDR

पु. ल. देशपांडे यांनी ‘हरितात्या’मध्ये सुगरणीबद्दल लिहिलेल्या तीन ओळी मला कायम आवडतात. अनेक ठिकाणी जेवताना त्या तीन वाक्यांची आठवण जरूर होते. ‘हरितात्या’मध्ये आजीबद्दल वर्णन करताना पुलं म्हणातात, ‘माझी आजी अगदी अन्नपूर्णा होती. तिचा हात सढळ होता. त्या हातानी तिनं पाणी वाढलं, तरी अधिक चवीचं वाटायंच…’ कमीतकमी शब्दांमध्ये समर्पक वर्णन.

आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक अन्नपूर्णा असतात. ज्यांच्या हातचा साधा वरणभातही अधिक स्वादिष्ट लागतो. कोकणातल्या हरिहरेश्वरच्या अलिकडे एक-दोन किलोमीटर अंतरावरील ‘मारळ’च्या कुटुंबे काकू अशाच अन्नपूर्णा. पुणे-हरिहरेश्वर मार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे नि ‘ताम्हिणी’त धबधब्यांखाली भिजायला आलेले त्रासदायक दारुडे यांना चुकवत आपण एकदाचे मारळला पोहोचतो. गाडी चालवून आलेला शीण कुटुंबे यांच्याकडे जाऊन पानावर बसण्याच्या कल्पनेनेच कुठच्या कुठे दूर पळू जातो.

IMG-20170612-WA0009(कुटुंबे यांच्या घराशेजारील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर… छायाचित्र सौजन्यः अमित धांदरफळे)

पदार्थांसाठी आवश्यक असे जिन्नस प्रमाणात पडले की स्वयंपाक स्वादिष्ट होतो, हे एकदम झूठ आहे. फक्त एवढंच पुरेसं नाही. मला वाटतं, की याला जोड हवी दुसऱ्याला प्रेमानं खाऊ घालण्याच्या वृत्तीची. अगदी मनापासून आग्रह करकरून वाढण्याची. मारळच्या कुटुंबे नामक कुटुंबामध्ये आपल्याला याचा अगदी नक्की अनुभव येतो. कोणतीही कटकट न करता अगदी मनापासून इथं आपलं स्वागत होतं आणि जिभेचे चोचले पुरविले जातात. कुटुंबेंकडे जाण्याची ही माझी दुसरी खेप. पुढच्या वेळी आपण आधीपेक्षा अधिकच प्रेमात पडतो, असा माझा अनुभव.

मागच्या वेळी गेलो होतो, तेव्हा रात्रीच्या जेवणानंतर अचानकपणे ‘स्वीड डिश’ म्हणून उकडीचे मोदक समोर आले होते. भरपेट जेवल्यानंतरही गर्रमागर्रम उकडीच्या मोदकांचा मोह झालाच होता. दुसऱ्या कोणाची तरी ऑर्डर असतानाही त्या मायमाऊलीनं आमच्याकडून कोणतीही अतिरिक्त शुल्कवसुली न करता मोदक दिले होते. कोकणात अनेक ठिकाणी आदरातिथ्याचा अनुभव येत असला, तरीही बऱ्याच ठिकाणी अशी आपुलकी दिसतेच असं नाही. त्यामुळं यंदा आम्ही सकाळच्या जेवणाला उकडीच्या मोदकांची ऑर्डर देऊनच ठेवली होती.

IMG-20170612-WA0010

(कुटुंबे कुटुंबीयांच्या घराचे प्रवेशद्वार… छायाचित्र सौजन्यः अमित धांदरफळे)

रात्री पोहोचल्यानंतर फ्रेश होऊन आम्ही थेट पोहोचलो कुटुंबे यांच्या घरी. घरासमोर मोकळ्या जागेतच भोजनाची व्यवस्था केलेली. अगदी साधी टेबलं आणि खुर्च्या. अगदी साध्याच पण प्रचंड वैविध्यपूर्ण अशा जेवणामुळं आमचा प्रवासाचा शीण एकदम नाहीसा झाला. बिरड्याची उसळ, भेंडीची परतून भाजी, खोबरं घालून केलेली चिंचगुळाची आमटी, मऊसूद घडीच्या पोळ्या, खजुराचं आणि आंब्याचं लोणचं, उसळी मिरची, कांद्याची चटणी आणि कांदा-टोमॅटोची कोशिंबीर. पांढरा भात आणि खिचडी. सोलकढी आणि ताक अनलिमिटेड. कधी मिरगुंड, तर कधी पोहे, उडीद आणि कसले कसले पापड. नुसतं इतकं वैविध्य हेच वैशिष्ट्य नाही, तर अगदी सढळ हातानं आणि अगदी मनापासून सर्व पदार्थ वाढण्याची वृत्ती… आता तर कुटुंबे यांचे चिरंजीवही ‘इन्फोसिस’मधील नोकरी सोडून आपल्या कुटुंबाच्या वीस वर्षांपासूनच्या व्यवसायात आई-वडिलांचा आदरातिथ्याचा वारसा पुढे नेण्यासाठी दाखल झाले आहेत.

IMG_20170625_213036357

स्वयंपाक अगदी घरच्यासारखा. म्हणजे अगदी घराघरातल्या आई-मावशीच्या हातासारखा. डाळिंब्याची उसळ (सोललेल्या वालाची) म्हणजे सुख. जमली त्यालाच जमली. अंगा पुरता रस्सा नि हलकी गुळाची चव. उसळींमध्ये सर्वाधिक वरचा दर्जा. भेंडीची भाजी देखील दर्जेदार. अगदी साधा आमटी-भात खाल्ला तरी सुखाची परिसीमा अशी परिस्थिती. खिचडी देखील वाफाळती आणि तिखट-मीठाचा अगदी हलका वापर करून बनविलेली. बाकी तोंडी लावण्यासाठी असलेल्या पदार्थांमध्ये खजुराच्या लोणच्याच्या आम्ही सगळेच प्रेमात पडलोय. कांद्याची चटणी देखील एकदम हटके. उसळी मिरची आणि आंब्याचं लोणचं देखील ताव मारण्यासारखंच. जेवणाच्या सुरुवातीलाच दिलेली सोलकढी आणि शेवटच्या टप्प्यात आलेलं ताक यांनी सुखाला आणखी वरच्या टप्प्यावर नेलं. आधीच्या टप्प्यात सोलकढीवर नि नंतर ताकावर तुटून पडण्याखेरीज पर्यायच नव्हता. जेवताना सर्वांना समान न्याय हेच आपलं धोरण.

सकाळच्या न्याहारीसाठी आम्ही आवर्जून आंबोळीच सांगितली होती. पोहे, उपमा आणि खिचडी तर पुण्याती मिळते. कोकणात जाऊन ते खाण्याची हौस नव्हती. त्यामुळे आम्हाला आंबोळ्याच हव्या होत्या. नेमकी दुपारी मोदकाची ऑर्डर असल्यामुळे कठीण मामला होता. त्यामुळं थोड्या आंबोळ्या आणि थोडे पोहे असा नाश्ता ठेवू, असा पर्याय पुढे आला. मात्र, मंडळी आंबोळ्यांवर तुटून पडली, की उगाच पोह्यांवर अन्याय व्हायचा. त्यामुळं पोहे नकोच. आंबोळ्याच करा सर्वांसाठी. वीस जणांसाठी माऊलीनं आंबोळ्या केल्या. सोबत भरपूर लसूण घातलेली खोबऱ्याची चटणी.

IMG_20170626_090408925

आंबोळीतही लसणाचे तुकडे हलकेच दाताखाली येत होते. ते अधिकच मस्त लागत होतं. गर्रमागर्रम आंबोळ्या येत होत्या आणि टप्प्याटप्प्यानं समाधानाची अनुभूती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होती. आंबोळ्या म्हणजे एकप्रकारचे घावनच. तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, नावापुरते गहू, मेथी आणि एक-दोन जिन्नस एकत्र दळून आंबोळीचं पिठ तयार होतं. मग ते रात्री किंवा सकाळी भिजवायचं नि आंबोळ्या करायच्या. सोबतीला कच्च्या करवंदांची वा खोबऱ्याची चटणी. तीन-चार आंबोळ्या रिचवून सारी मंडळी मारळच्या समुद्रकिनारी रवाना झाली. मारळचा समुद्रकिनारा एकदम सुरक्षित. हरिहरेश्वरच्या लगतच असला तरीही धोकादायक नाही.

समुद्रकिनाऱ्यावर तास-दीड तास घालविल्यानंतर मग स्नानादिक आन्हिके उरकल्यानंतर परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. सामानाची जुळवाजुळव आणि पॅकिंग पार पडलं. एव्हाना घड्याळाने दीडचा आकडा गाठला होता. दुपारच्या जेवणाची चाहूल लागू लागली. खुर्च्या ठेवल्या गेल्या. ताटं मांडली गेली. सकाळच्या जेवणाला बेत होता बटाट्याची सुकी भाजी, आळुची भाजी आणि मटकीची उसळ. मुख्य आकर्षण अर्थातच, उकडीचे मोदक आणि त्यावर मनसोक्त रवाळ तूप. डाव्या बाजूला खजुराचं आणि आंब्याचं लोणचं, उसळी मिरची आणि आळूच्या वड्या. पोळी आणि भाताऐवजी मोदकावरच ताव मारणं साहजिक होतं. बाकी बटाटा आणि मटकी या भाज्या स्वादिष्ट असल्या तरी त्या आमचं लक्ष वेधून घेऊ शकल्या नाहीत.

20170626_135742

मोदकावरची आमची श्रद्धा आणि निष्ठा अटळ राहिली. मोदकाची पारी पण एकदम नाजूक. आणि मोदकपात्रातून थेट पानात येत असल्यामुळे गर्रमागर्रम मोदकांची गोडी आणखीनच वाढली होती. आळूची भाजी, आळूवड्या आणि भात हे पदार्थही मान राखण्यापुरतेच घेतले गेले. सर्वाधिक लक्ष दिलं जात होतं, रवाळ तुपाची धार धरलेल्या गर्रमागर्रम उकडीच्या मोदकांवर. फोडलेल्या मोदकात घातलं तरीही ताटात इतरत्र पाघळत जाणारं तूप मध्येच अडवून मोदकाचा फडशा पाडणं हे मोठं कौशल्याचं काम असल्याचं अस्मादिकांच्या लक्षात आलं. पारंगत होण्यासाठी आणखी तीन-चार वेळा तरी याचं प्रात्यक्षिक करावं लागणार, हे देखील ध्यानात आलं. अखेरीस थोडासा भात नि आळूची भाजी खाऊन नंतर दोन वाट्या ताक भुरकल्यानंतर आम्ही पानावरून उठलो. तृप्त मनानं म्हणजे काय, याचा अनुभव आपल्याला कुटुंबे यांच्याकडे जेवल्यानंतर नक्की येतो.

20170626_135733

कुटुंबे, मारळ आणि हरिहरेश्वर यांचा निरोप घेताना आपलं मन अगदी तृप्त असतं… निघताना कुटुंबे काकूंशी अगदी थोड्या गप्पा होतात. जे करायचं ते अगदी मनापासून, हाच या व्यवसायाचा गाभा आहे. वीस वर्षे आम्ही हा व्यवसाय करतोय. लोक अगदी हक्कानं आमच्याकडे येतात. प्रसंगी फिश खात नाहीत, पण आमच्याकडे जेवतात. कुटुंब येतात, मुलांचे ग्रुप येतात. काही जण फक्त जेवायला येतात. कुटुंबे काकू बोलत असतात. अशा सर्व मंडळींमुळेच आमच्या मुलांची शिक्षणं झाली. मुलीचं लग्न झालं, याची जाणीव त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी असते. आम्हाला माणसं चांगली मिळाली, त्यामुळंच हे सर्व सुरळीत सुरू आहे. स्वयंपाकाला मदत करणाऱ्या बायका, वाढकाम करणारी माणसं, सगळं व्यवस्थापन बघणारा राजू यांच्या जोरावरच आमचं सगळं सुरू आहे. नाव कुटुंबेंचं असलं, तरी बरंचस योगदान या सर्व लोकांचंही आहे, हे जाहीरपणे मान्य करणंही असतं.

Kutumbe

सध्या आणखी तीन-चार खोल्या बांधण्याचं काम कुटुंबे यांनी मनावर घेतलंय. मुलगा इन्फोसिसमधली नोकरी सोडून व्यवसाय सांभाळायला आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. त्यामुळंच आणखी मोठी उडी मारतोय, असं त्या आवर्जून सांगतात. सारा हिशेब पूर्ण झालेला असतो आणि गप्पाही झालेल्या असतात. अत्यंत खूष होऊन आम्ही सगळे निघतो… हरिहरेश्वराला नमस्कार करून गाड्या पुण्याच्या मार्गाला लागतात…

IMG_20170625_153431765

Sai-Prasad

येता-जाता…

जाताना मुळशी धरणाच्या अलिकडेच साईप्रसाद नावाचं हॉटेल आहे. फॅमिलीसाठी एकदम छान. अंकुश जाधव नावाच्या व्यक्तीचं हे हॉटेल. पदार्थ बनविण्यापासून ते वाढणं, पैसे घेणं अशी बरीचशी कामं ते एकटेच करतात. हाताखाली दोन-चार लोक आहेत. पण अचानक तीस-चाळीस जण आल्यानंतर ते सर्व आघाड्यांवर लढत होते. राइस प्लेटमधील भाज्या सगळीकडे मिळतात तशाच. पण पिठलं-भाकरी आणि ठेचा एकदम भारी. सर्वात वरचा क्लास म्हणजे इंद्रायणी तांदळाचा वाफाळता भात आणि कांदा-टोमॅटो वापरून केलेली आमटी… बाहेर पडणारा पाऊस आणि आता इंद्रायणीचा गिचका भात. आम्ही काहीही माहिती नसताना फक्त फॅमिली रेस्तराँ एवढंच वाचून घेतलेला तुक्का अगदी मस्त लागला होता. जेवणानंतर मागावलेला चहा देखील एकदम कड्डक… हवा तसा.

IMG-20170627-WA0011

येताना माणगावमधील नेहमीच्याच ‘बाळाराम’मध्ये गेलो. यापूर्वी दोनदा तिथं जाणं झालं होतं. दुपारी जेवण उशीरा झालं होतं त्यामुळं भरपेट खाल्लं नाही. अन्यथा इथं मटार उसळ किंवा रस्सा भाजी आणि पुरी मस्त मिळते. डोसा, मेदू वडा आणि इतर दाक्षिणात्य पदार्थही उत्तम. बटाटे वडा आणि पॅटीस देखील अप्रतिम. सरतेशेवटी कडक चहा पुढच्या प्रवासासाठी तरतरी देणारा.

(ता. क. – सोमवारी दोघींचा उपवास असल्याचे अचानकच कुटुंबे यांना सांगितले. निरोप मिळाल्यानंतर तासा दीड तासातच कच्च्या केळीच्या पिठामध्ये दाण्याचं कूट आणि तिखट-मीठ घातलेली खास उपवासाची घावनं तयार करण्यात आली. सोबत खजुराचं आणि लिंबाचं उपवासाला चालणारं लोणचं. त्यामुळं उपवास असूनही चटकमटक असा आगळावेगळा पदार्थ खाण्याची संधी मिळाली. शिवाय दुपारच्या जेवणात उपवास असलेल्या दोघींसाठी कांदा-लसूण न वापरता स्वयंपाक करण्याचं औचित्यही कोणीही न सांगता साधलं गेलं होतं…)

12 thoughts on “हरिहरेश्वरची ‘कुटुंबे’वत्सल खाद्यसफर…

  1. aadhi ek tar tu lihile aahes mhatalyawar wachane must aste karan farach mast lihitos tu. aani tyatun khanyawar lihile aahes mag kay apratim asnarach. ekdam bhaaaaaari.

    Like

  2. लेख मस्त जमला आहे. आता मुद्दाम हरिहरेश्वरला जायला हवं.. तुझा लेख वाचताना कोकणात गेल्या काही महिन्यात दोन ठिकाणी घगुती जेवणाचा योग आला त्याची आठवण आली. एक दिवे आगरचे आवळस्कर कुटुंब आणि दुसरं आलिबागनजिक वर्सोलीचं पडवळ यांची वरदायिनी कॉटेज.दोन्ही ठिकाणी जेवण्याराहण्याची व्यवस्था उत्तम. पहिल्या ठिकाणी फक्त शाकाहारी..पण जेवणात आणि न्याहारीसाठी खास कोकणचे पदार्थ. आणि पडवळ म्हणजे मत्स्यप्रेमींसाठी पर्वणी..सगळे मिळून जाऊ..

    Like

  3. लेख मस्त जमला आहे. आता मुद्दाम हरिहरेश्वरला जायला हवं.. तुझा लेख वाचताना कोकणात गेल्या काही महिन्यात दोन ठिकाणी घगुती जेवणाचा योग आला त्याची आठवण आली. एक दिवे आगरचे आवळस्कर कुटुंब आणि दुसरं आलिबागनजिक वर्सोलीचं पडवळ यांची वरदायिनी कॉटेज.दोन्ही ठिकाणी जेवण्याराहण्याची व्यवस्था उत्तम. पहिल्या ठिकाणी फक्त शाकाहारी..पण जेवणात आणि न्याहारीसाठी खास कोकणचे पदार्थ. आणि पडवळ म्हणजे मत्स्यप्रेमींसाठी पर्वणी..सगळे मिळून जाऊ..

    Like

  4. लेख मस्त जमला आहे. आता मुद्दाम हरिहरेश्वरला जायला हवं.

    Like

  5. sir khupach chan likan ani khadya brhamanti manje tondala photo baguen pani sutlae .manala mohnara gulabi rang ani surekh swad ti pan soalkadi manje kokan goa chi trip zalich pahije . vate madhe bhetnare chot hotelas surekh ani me etkya veal javuen alo tari mazay najrtuen he kase kay sutele manje tyla tumchya sarkhi Gharich najar ANI khavyae pahije chan surech dhanewad

    Like

Leave a comment