श्रमपरिहार आणि पुन्हा धुंधुरमास…

सहभोजनामुळेच संघ वाढला

12471650_10153268467931570_1231541913449113839_o

पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘शिवशक्ती संगम’ या कार्यक्रमामुळे अनेकांच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल औत्सुक्य निर्माण झालेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर संघाचं काम कसं काय उभं राहिलं, इतक्या मोठ्या प्रमाणावर संघ वाढू कसा काय शकला, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. संघाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा अनेकांच्या मनात उत्पन्न झाली आहे.

संघ कशामुळे वाढला, या प्रश्नाची अनेक उत्तरे आपल्याला मिळतील. हिंदुत्त्वाच्या विचारांमुळे संघ वाढला, असं कुणी म्हणेल. कुणी म्हणेल डॉक्टर हेडगेवारांनी संघाची ज्या पद्धतीने मांडणी आणि बांधणी केली त्यामुळे संघ वाढला. कुणाला वाटेल, की आतापर्यंतचे हजारो संघ प्रचारक आणि अनेक अधिकारी, पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमांमुळे संघ वाढला, विस्तारला. अशी अनेक उत्तरं अनेकांकडून मिळतील. ती खरीही आहेत.

मला असं वाटतं, की जेवणाच्या कार्यक्रमांमुळे संघ वाढला. चंदनाचे किंवा रक्तचंदनाचे (सामिष भोजन) कार्यक्रम, डब्बा पार्ट्या, विविध ठिकाणच्या सहली, शिबिरं, निरनिराळ्या निमित्ताने होणारे भोजनोत्तर कार्यक्रम अशा गोष्टी संघाच्या वाढीस खूपच पूरक आहेत. नव्हे नव्हे त्यामुळेच संघ वाढला आणि अधिक समरस झाला…

IMG_20160116_211442

सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात… कुणी म्हणतं ‘The Family that Eats Together, Stays Together’ त्याच धर्तीवर मला म्हणावसं वाटतं, की ज्या संघटनेचे सदस्य किंवा कार्यकर्ते नेहमी अगदी सहजपणे एकत्र जेवतात, ती संघटना कायम मजबूत आणि एकजीव राहू शकते.

संघामध्ये कधीच जातपात पाळली गेली नाही. अगदी डॉक्टर हेडगेवार यांच्या काळापासून हाच दंडक राहिलेला आहे. त्यामुळेच ज्या काळात सवर्ण आणि बहुजन शेजारी-शेजारी बसून भोजन घेत नसत, त्याच काळात संघाच्या शिबिरांमध्ये, संघ शिक्षा वर्गांमध्ये, शाखांमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र बसून चंदनाचे आणि डब्बा पार्ट्यांचे कार्यक्रम करीत होते. जातीविरहित समाजाचे दर्शन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनाही संघामध्येच घडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही जातीभेद निर्मूलनासाठी स्पृश्यास्पृश्यांच्या सहभोजनाचे अनेक कार्यक्रम घेतले. डॉ. हेडगेवार यांच्या संघामध्ये अशा पद्धतीने सहभोजनाचे कार्यक्रम आवर्जून घ्यावे लागले नाहीत. जे घडले ते आपसूक घडले.

IMG_20160116_211456

आताच हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे नुकतेच लागोपाठ झालेले दोन कार्यक्रम. पहिला म्हणजे शिवशक्ती संगमच्या निमित्ताने प्रचार विभागाचा झालेला श्रम परिहाराचा कार्यक्रम आणि दुसरे म्हणजे लोकमान्यनगर परिसरातील कार्यकर्त्यांचे सहकुटुंब पार पडलेले धुंधुरमासाचे जेवण. श्रमपरिहार असला तरीही सशुल्क. म्हणजे आधी श्रमही करायचे आणि नंतर परिहारासाठी शुल्कही मोजायचे. हे फक्त संघातच घडू शकतं बुवा. दुसरा कार्यक्रमही सशुल्क. संघात फुकट काहीही नाही. आणि कदाचित त्यामुळंच संघ आतापर्यंत टिकलाय आणि वाढलाय.

गरवारे कॉलेजच्या पार्किंगमध्ये पार पडलेल्या ‘श्रम परिहारा’च्या कार्यक्रमात नरेंद्र जोशी यांनी खास दाक्षिणात्य मेन्यू ठेवला होता. खास दावणगेरेहून त्यांनी खानसामे बोलविले होते. डी. एन. लिंगराज यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या राजू डोसेवाला (पुणे ९८९०८५४४५३ आणि दावणगेरे ९१६४२०००८०) यांना पाचारण करून जोशी यांनी भलताच माहोल निर्माण केला होता. पुण्यामध्ये गुरुवार पेठेत राजू डोसेवाला यांचे कुठेतरी आउटलेट आहे. अजून तिथं जायचंय. गरवारेतील अनुभव खूपच छान होता. त्यामुळे शोधाशोध करून तिथं जावंच लागणार. बघू कधी जमतंय ते…

IMG_20160116_211811

गर्रमागर्रम मसाला डोसा, लोणी डोसा, छोटेखानी उत्तप्पे, नाजूकसाजूक तट्टे इडली, खमंग अप्पे, दक्षिणेकडे मिळतात अशा दोन-तीन प्रकारच्या चटण्या आणि शेवटी पायनापल शिरा. खोबऱ्याची पांढरी आणि लालमिरचीपासून बनविलेली लाल चटणी. अप्प्यांसाठी खास पूड चटणी आणि साजूक तूप. व्वा… एकदम बढियाच. आणखी एक सांगायचं म्हणजे फक्त पदार्थ दाक्षिणात्य असून मजा येत नाही. वातावरणही दाक्षिणात्य वाटलं पाहिजे. तो माहोल मस्त जमून आला होता. नाहीतर हे पदार्थ काय वैशाली-रुपाली आणि वाडेश्वर इथंही मिळतात.

कुरकुरीत डोशांसाठी आवश्यक असा तवा… मधूनच त्यावर पाणी मारून होणारा चर्रर्रर्र असा आवाज. एकाच वेळीच चार पाच डोसे किंवा उत्तप्प्यांचा होत असलेला जन्म. अप्प्यांसाठी बिडाचा भलामोठा साचा. त्यामध्ये अविश्रांतपणे निघत असलेले अप्प्यांचे घाणे आणि या आगळ्यावेगळ्या पदार्थावर उपस्थितांच्या पडणाऱ्या उड्या. अॅल्युमिनियमचं इडली पात्र धगधगतच होतं. ठराविक वेळानं मऊसूद अशा तट्टे इडल्या बाहेर काढल्या जात होता. वाफाळत्या इडल्यांवर मंडळी डोळा ठेवून होती. मुख्य म्हणजे सर्व खानसाम्यांनी लुंगी नेसलेली. गळ्यात काठाचं उपरणं. त्यामुळं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं दावणगेरेमध्ये कुठंतरी कॉलेज सुरू केल्यासारखं वाटत होतं.

IMG_20160116_211832

डोसे, इडली आणि अप्पे यांच्यापुढे पायनापल शिरा म्हणजे माझ्यासाठी किस झाड की पत्ती. त्यामुळे पायनापल शिऱ्याकडे ढुंकूनही पहावसं वाटलं नाही. डोसा, इडली आणि अप्पे यांच्या मात्र, अनेक राउंड्स झाल्या. चटण्यांनी विशेषतः पूड चटणी आणि तूप यांनी जेवणात रंग भरले. प्रत्येक गोष्टीमध्ये दाक्षिणात्य स्वाद जाणवत होता. जेवणासाठी शिवशक्ती संगमच्या वेळी वापरण्यात आल्या होत्या, तशाच सुपारीच्या पानांपासून बनविलेल्या प्लेट्स होत्या. (तिथं न वापरलेल्या प्लेट्स होत्या, की राजू डोसेवाल्यानं स्वतःहून आणल्या होत्या, ते काही विचारण्याचा खडूसपणा केला नाही.)

राउंड पे राउंड नंतर तिथनं निघावं लागलं. फक्त एक कमतरता भासली. दाक्षिणात्य पदार्थांचा इतका झकास आस्वाद घेतल्यानंतर वाफाळती कडक फिल्टर कापी असती तर मग मेन्यू अधिक परिपूर्ण झाला असता. दाक्षिणात्य पदार्थ झोडपल्यानंतर कापी मस्टच… हा झाला गमतीचा भाग. पण पारंपरिक पदार्थांना फाटा देऊन श्रम परिहारासाठी ‘हटके मेन्यू’ची निवड केल्याबद्दल नरेंद्र जोशी, विनय चाटी आणि अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यांचे त्रिवार अभिनंदन.

IMG_20160117_095413

शनिवारची रात्र स्वादिष्ट होती. तशीच रविवारची सकाळही. एरवी आमची रविवार सकाळ हिंदुस्थान किंवा मॉडर्नच्या पॅटिसनं सुरू होते. मात्र, ही रविवार सकाळ धुंधुरमासाच्या भरपेट जेवणानं सुरू झाली. यापूर्वी दोनवेळा धुंधुरमासाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मी सहभागी झालो होतो. दोन्हीवेळा ज्यांनी आम्हाला रुचकर भोजनाची अनुभूती दिली, त्याच माधवराव परांजपे यांनी यंदाच्या वर्षीही आमचा धुंधुरमास संस्मरणीय करून टाकला. फरक फक्त एवढाच की आधीच्या दोन्ही वेळा पंगती उठल्या होत्या. यंदाच्या वर्षी बुफे पद्धतीनं धुंधुरमास साजरा झाला. शेवटी काय पदार्थ महत्त्वाचे जेवण्याची पद्धती नाही.

धुंधुरमास आणि माधवराव परांजपे हे समीकरणच जुळलंय. माधवरावांच्या राष्ट्रपतींच्या हाताला चव आहे. धुंधुरमासाच्या जेवणात इतकं वैविध्य असतं, की इतके सगळे पदार्थ करण्यासाठी ही मंडळी पहाटे किती वाजता उठत असतील, असा प्रश्न मला कायम पडतो. पांढरे तीळ पेरलेली बाजरीची भाकरी, भाकरीवर लोण्याचा गोळा, लेकुरवाळी भाजी, शेंगाची चटणी, अगदी कडेपर्यंत गूळ पोहोचलेली गुळाची पोळी, गुळाच्या पोळीवर मस्त रवाळ तूप, घरच्या तुपाला असतो तसा खमंगपणा ठायीठायी जाणवणारा, मटार घातलेली तूरडाळीची खिचडी आणि सर्वात शेवटी पण सर्वाधिक ओरपली जाणारी आलं-मिरचीचा ठेचा लावलेली झटका मारणारी गर्रमागर्रम कढी.

IMG_20160117_095610

लेकुरवाळी भाजी घरोघरी होते. भोगीच्या दिवशी. गाजर, वांगी, बटाटा, टोमॅटो, पावटा, श्रावण घेवडा आणि इतर अनेक भाज्या एकत्र करून ही भाजी तयार करतात. यंदाच्या वेळी लेकुरवाळ्या भाजीत अॅडिशन जाणवली ती शेवग्याच्या शेंगांची. शेवग्याच्या शेंगांमुळे लेकुरवाळ्या भाजीला असा काही स्वाद आला होता, की विचारता सोय नाही. लेकुरवाळी असली तरी भाजी जरा झणझणीतच होती. ‘परांजपे’ नावाच्या केटरर्सकडून अशी अपेक्षा नव्हती. पण थंडी आहे, त्यामुळं मुद्दामच थोडी अधिक झणझणीत केली, असं सांगून माधवरावांनी आग्रह करकरून तर्रीदार भाजी वाढली. लेकुरवाळ्या भाजीनं भल्या पहाटे थंडीतही घाम फोडला.

IMG_20160117_095233

एकीकडे बाजरीची भाकरी आणि लोण्याचा गोळा यांची सुंदर आघाडी होती, तर दुसरीकडे गुळाची पोळी नि रवाळ तूप यांची युती मस्त जमून आली होती. सरशी कोणाची होणार याचा मात्र, पत्ता नव्हता. एका घासाला भाकरी वरचढ वाचायची. तर दुसऱ्या घासाला गुळाची पोळी आघाडी घ्यायची. लेकुरवाळ्या भाजी सोबत बाजरीच्या दोन भाकऱ्या कुठे गुडुप झाल्या कळलं देखील नाही. गुळाच्या पोळीचंही तेच. बिनआग्रहाच्या आणि आग्रहाच्या किती पोळ्या गट्टम झाल्या कुणास ठाऊक. सक्काळी सक्काळी एवढं जेवण जाईल का, अशी भ्रांत कार्यक्रमापूर्वी आपल्याला सतावते. पण एकदा का पानावर बसलं, की मग भाकरी नि गुळाच्या पोळीचा आकडा असा काही वाढतो की विचारता सोय नाही.

IMG_20160117_095252

भाकरी आणि पोळीचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर खिचडीकडे मोर्चा वळविला. भाताशिवाय जेवण नाही. आणि नुसत्या ताकापेक्षा कढी असेल तर खिचडीच्या स्वादाला सुरेख फोडणी मिळते. कढी-खिचडीनं आमचा धुंधुरमास परिपूर्ण केला. आलं-मिरचीच्या वाटणामुळं कढीची चव छान जुळून आली होती. खिचडी सुद्धा फडफडीत नव्हती. डाळ-तांदूळ छान एकजीव झाले होते. त्यामुळं कढी ओतल्यानंतर खिचडी अगदी मस्त रसरशीत होत होती. फडफडीत खिचडीमध्ये कढी टाकल्यानंतर ती अस्ताव्यस्त पसरते. पानभर होते. मात्र, इथं खिचडी कढीला बांधून ठेवत होती. त्यामुळं जेवणातली मजा उत्तरोत्तर वाढतच गेली.

कढीभाताचा भरपेट आस्वाद घेतल्यानंतर मग आमचे धुंधुरमासाचे भोजन आटोपले. संघाची बंदी आणि इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात एका किस्सा किंवा आठवण संघाच्या कार्यक्रमांमधून कायम सांगितली जाते. ती अशी… संघावर इंदिरा गांधींनी जेव्हा बंदी घातली, तेव्हा काँग्रेसच्या एका नेत्याने इंदिराजींनी सांगितले, की जोपर्यंत आपण दोन लोकांना भेटण्यावर बंदी घातल नाही. दोन जणांनी एकत्र येऊन संवाद साधण्यावर बंदी घालत नाही. तोपर्यंत संघावर अशी कायद्याने बंदी घालून काहीही उपयोग होणार नाही. झालंही तसंच. संघावर तीनवेळा बंदी घातली गेली. पण संघ वाढतच गेला.

IMG_20160117_095331

IMG_20160117_095358

तोच धागा पकडून असं म्हणावसं वाटतं, की जोपर्यंत असे सहभोजनाचे आणि चंदनाचे कार्यक्रम सुरू आहेत, तोपर्यंत संघाला मरण नाही. संघ उत्तरोत्तर वाढतच जाणार…

धुंधुरमासावर या आधी लिहिलेला ब्लॉग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

हैदराबादची दम बिर्याणी

सुखद, समृद्ध आठवणी…

हैदराबाद आणि ई टीव्ही मराठी हे दोन्ही शब्द माझ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. कधीकाळी हैदराबाद म्हणजे ई टीव्ही आणि ई टीव्ही म्हणजे हैदराबाद हेच समीकरण दृढ होतं. ई टीव्हीमध्ये हैदराबादला काम करण्याचा अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतलाय, त्यांचीही अवस्था कदाचित अशीच असेल. पक्का पुणेकर असूनही हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिथं आपलं कसं होईल, असा प्रश्नच मनात होताच. पण तरीही जायचं निश्चित केलं आणि गेलोच. जवळपास दीड वर्षांच्या कालावधीत हैदराबादनं खूप काही शिकवलं.

काय शिकवलं हैदराबादनं… पहिलं म्हणजे महाराष्ट्रापासून दूर जाऊन महाराष्ट्र नि मराठी माणसाकडे पहायला शिकवलं, अत्यंत नवख्या असलेल्या प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक मीडियाची बाराखडी शिकविली, स्क्रिप्टिंगपासून ते व्हिडिओ एडिटिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीचा फर्स्ट हँड अनुभव घ्यायला शिकवलं, दोन दोन महिने रात्री बारा ते सकाळी आठ नाईट करायला शिकवलं, दोघांच्याच जोरावर अर्ध्या तासाचं बुलेटिन काढायलाही शिकवलं, परस्परांना सांभाळून घ्यायला शिकवलं, एकमेकांना धरून रहायला शिकवलं, ‘रुम’चं रुपांतर घरामध्ये करायला शिकवलं, ‘घरभाऊ’ या संकल्पनेत रहायला शिकविलं, रोजच्या रोज स्वयंपाक (बहुतांश वेळा खिचडीच) करायला शिकवलं, खरकटी भांडी घासायला शिकवलं, स्वतःचे कपडे स्वतःच धुवायला शिकवलं, इडली-डोसाच्या प्रेमात पडायला शिकवलं, एकीकडे भरपूर भाताचा फडशा पाडायला शिकवलं, दुसरीकडे घरच्या वरण-भाताची किंमत करायला शिकवलं, चिकन बिर्याणीवर तुटून पडायला शिकवलं नि कधीकधी चहा-बिस्किटांवर दिवस काढायलाही शिकवलं, तेलुगू कळत नसूनही नियमितपणे तेलुगू चित्रपट पहायला शिकवलं, चारमिनार बाजारात जाऊन ‘बार्गेनिंग’ करायला शिकवलं, पांढरी शुभ्र धोती नेसायला शिकवलं, पुण्या-मुंबईत मिळते तशी पाणीपुरी नि भेळवाले शोधायला शिकवलं, फक्त एक वडापाव खाण्यासाठी सिकंदराबादपर्यंत जायला शिकवलं… हैदराबादनं हे आणि असं बरंच काही शिकवलं… म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही हैदराबादवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. अजूनही सगळ्या आठवणी आहे तशाच डोळ्यासमोर आहेत…

DSC00588

या आठवणींचा फ्लॅशबॅक नुकताच अनुभवला. पंधरा ऑगस्टला जोडून आलेल्या तीन-चार सुट्यांची संधी साधून हैदराबादचा छोटेखानी पण संस्मरणीय दौरा पार पडला. हैदराबादला असताना बाबा आणि चुलत भावाबरोबर आमचं सगळं पाहून झालेलं आहे. तरीही वहिनी बरोबर असल्यामुळं गोवळकोंडा, रामोजी फिल्म सिटी, चारमिनार आणि शेजारच्या लाड बाजारात (चुडी बाजार) जाणं क्रमप्राप्तच होतं. रामोजी फिल्म सिटीमध्ये जवळपास दीड वर्ष काम केलेलं असल्यामुळं सर्व आठवणी या निमित्तानं जाग्या झाल्या. असं वाटलं, साला बसमधून उतरावं आणि पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र माझा’ किंवा ‘आपली मुंबई’चं बुलेटिन काढायला घ्यावं… पण…

हैदराबादला जाण्याचं मुख्य कारण म्हणजे बिर्याणीचा आस्वाद घेणं हेच होतं. अर्थात, मी अनेकदा ऑथेंटिक हैदराबादी बिर्याणी खाल्लेली आहे. पण वडिलांना अस्सल बिर्याणी खाऊ घालायची होती. पुण्यात अनेक ठिकाणी ते बिर्याणी खात असतात. अनेकदा घरी ऑर्डर देऊनही मित्रांसोबत बिर्याणीचा बेत आखला जातो. मात्र, आपल्याकडे ऑथेंटिकच्या नावाखाली किंवा बिर्याणीच्या नावाखाली काहीही खपवतात. त्यामुळेच त्यांना बिर्याणी म्हणजे नेमकं काय ते एकदा खाऊन बघा, असा विचार अनेक दिवसांपासून मनात होता आणि त्यातूनच मग हैदराबादचा बेत आखण्यात आला.

hotel-shadab-hyderabad_3049058_l Shadab-hotel-Hyderabad

मी हैदराबादमध्ये सर्वप्रथम बिर्याणी खाल्ली ती पिस्तामध्ये. मग शादाब, मदिना, सिकंदराबादमधलं डायमंड आणि पॅराडईज, अशा तीन-चार ठिकाणी अनेकदा वारी होऊ लागली. त्यातही प्रामुख्यानं शादाबवर भर अधिक. कारण ते अगदीच टप्प्यात होतं. त्यामुळं शादाब आणि पॅराडाइजचा कार्यक्रम करायचं निश्चित केला होतं. हैदराबादमध्ये चौकशी केल्यानंतर कळलं, की पॅराडाइजची बिर्याणी आता एकदम बकवास आहे. तू बावर्ची किंवा कॅफे बहारची बिर्याणी तू टेस्ट कर वगैरे वगैरे. पण तीनच वर्षांपूर्वी ‘पॅराडाइज’मध्ये जाऊन बिर्याणी खाल्ला होती. ती मला आवडली होती. आणि ‘ई टीव्ही’ची सेटलमेंट करण्यासाठी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा उमेशराव देशपांडे यांच्यासमवेत ‘शादाब’मध्ये ‘न्यायलयीन कामकाजातून सुटका’ सेलिब्रेट केली होती. त्यामुळंच ‘पॅराडाइज’ नि ‘शादाब’ हेच फिक्स केलं.

पहिल्याच दिवशी गोवळकोंडा, चारमिनार आणि लाड बाजारचा कार्यक्रम आटोपून शादाबमध्ये पोहोचलो. शादाब हे एकदम ऑथेंटिक हैदराबादी. पुण्यामध्ये मोमीनपुरा किंवा कॅम्पात रमजानच्या काळात जसं वातावरण असतं, अगदी तसंच वातावरण कायम असणारं हॉटेल. हैदराबादी मुस्लिम संस्कृतीचं दर्शन घडविणारं. बाहेर एका मोठ्या भांड्यामध्ये काही तरी रटारटा शिजत असतं. मला वाटलं, दालचा वगैरे आहे. पण ते काहीतरी भलतंच होतं. निहारी की तसं काहीतरी. मार्ग काढत निघालो.

खालच्या मजल्यावर जनरल पब्लिक. मधल्या मजल्यावर फॅमिलीसाठी भारतीय बैठक आणि पहिल्या मजल्यावर फॅमिलसाठी टेबल-खुर्ची अशा तीन वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या मजल्यावर आम्ही एव्हाना पोहोचलो होतो. हॉटेलचं इंटिरियर कसं आहे, अॅम्बियन्स कसा आहे, वेटर आणि आचारी यांचे कपडे कसे आहेत, ते पाणी कसं आणतात, याकडे न बघता फक्त पदार्थांचा आस्वाद घेण्यावर तुमचं लक्ष केंद्रित ठेवलं तर ‘शादाब’ दिलखूष करून टाकतं. आपल्याला चव महत्त्वाची.

IMG_20150815_220730627 Image104

आम्ही दोन चिकन बिर्याणी मागवून टाकल्या आणि भावासाठी व्हेज बिर्याणी. काही मिनिटांतच प्लेटभरून बिर्याणी आली. अनेकदा यापूर्वी लिहिलंय पण तरीही पुन्हा एकदा हैदराबादी बिर्याणीची ठळक जाणवलेली वैशिष्ट्य लिहिण्याचा मोह आवरत नाही. हैदराबादी बिर्याणीमध्ये एकतर मसाला अगदीच कमी असतो. म्हणजे ही बिर्याणी तुलनेनं फिक्की असते. मसाला हलका असतो, पण फक्त चिकन आणि भात हे कॉम्बिनेशन तुम्ही एन्जॉय करू शकता. सोबतीला कांदा, दहीरायता नि शोरबा मिळतो. पण त्यांच्याशी युती न करताही बिर्याणी मस्त लागते. फक्त भातही एकदम शाही असतो.

शिवाय गरम मसाल्याचे पदार्थ भातामध्ये अस्ताव्यस्त पसरलेले आढळत नाहीत. क्वचित एखादी लवंग सापडली, तर सापडते. ही मंडळी काय करतात, गरम मसाल्याचे सर्व पदार्थ एका पुरचुंडीत बांधून सोडतात. त्यामुळे मसाल्याचा स्वाद लागतो, पण पदार्थ दाताखाली येऊन जेवणाचा बेरंग करत नाहीत. आपल्याकडे बिर्याणीमध्ये आम्ही खूप मसाले टाकतो, असं दाखवायला मंडळी लवंग, वेलदोडे, तमालपत्र, मिरी आणि बरंच काही टाकतात. त्यामुळे प्रत्येक घास घेताना मसाल्याचे पदार्थ बाजूला करण्यातच निम्मा वेळ जातो. हे कष्ट हैदराबादी बिर्याणीमध्ये घ्यावे लागत नाहीत.

 IMG_20150816_205323

इथलं सर्वाधिक वेगळेपण म्हणजे चिकनचे बारीक बारीक पिसेस करून टाकलेले नसतात. म्हणजे खूप पिसेस आहेत, असं भासविण्यासाठी. एक लेगपीस आणि आणखी एखादा पीस बिर्याणीमध्ये असतो. बरं चिकनही शिजूनही इतकं नाजूक झालेलं असतं, की विचारता सोय नाही. मग वेटरही दोन चमच्यांच्या (किंवा चमचा आणि काट्याच्या) सहाय्यानं लेगपीसचे दोन तुकडे करून बिर्याणी राईससोबत वाढतात. अनेक ठिकाणी हातानं सोडा, दातानं चिकन चावता येत नाही. इथं चमच्यावर हलकाच दाब देऊन चिकनचे दोन तुकडे करण्यात येतात. लेगपीसला लागलेला मसाला आणि भाताभोवतीचा तेल-मसाला फक्त एवढ्याच ऐवजावर बिर्याणी मैदान मारून जाते.

तिघांमध्ये दोन बिर्याणी पुरून उरते. एखाद्याची भूक अधिक असेल, तरच बिर्याणीच्या दोन्ही प्लेट्स साफसूफ होतात. बिर्याणीनं पोट भरलं असलं तरीही थोडीशी जागा ‘खु्ब्बानी का मिठा’साठी ठेवायलाच हवी. भिजवलेल्या जर्दाळूची पेस्ट, त्यामध्ये वेलचीचा हलका स्वाद, मध असा भरपूर मिट्टगोड चवीचा ‘खु्ब्बानी का मिठा’ शेवट गोड करून न जातो तेच नवल. काही ठिकाणी ‘खुब्बानी का मिठा’त आइस्क्रिमही घातलेलं असतं. पण शादाबमध्ये आइस्क्रिम नसलेला ‘खुब्बानी का मिठा’ खाल्लाला. उफ्फ्फ…. इतकं सगळं खाल्ल्यानंतर घरी जायचं सोडा, पाऊल पुढे टाकणं जीवावर आलं होतं.

DSC00510

दुसरा दिवस ‘रामोजी फिल्म सिटी’च्या नावे होता. ‘रामोजी’ म्हणजे आठवणींची समृद्ध साठवण… बस पकडण्यासाठी होणाऱ्या मारामारीपासून ते ‘नाईट शिफ्ट’ला दीड-दोन वाजता येणाऱ्या इडली-चटणीपर्यंत अनेक आठवणींचा खजिना म्हणजे ‘रामोजी फिल्म सिटी’. ई टीव्ही आणि आठवणी हा स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे. त्यामुळे त्याबाबत इथं चर्चा नको. सांगण्याचा उद्देश काय तर ‘रामोजी फिल्म सिटी’मध्ये प्रचंड तंगडतोड केल्यानंतर आम्ही कोतापेठ इथं नव्यानंच सुरू झालेल्या ‘पॅराडाइज’मध्ये जायचं ठरवलं. वाकडी वाट करून सिकंदराबादला जायचं आणि तिथून परत राहतो तिथं दुसऱ्या टोकाला जायचं ही कसरत शक्य नव्हती. त्यामुळं मग कोतापेठच्या ‘पॅराडाइज’मध्येच मैफल रंगली.

IMG_20150816_213124 IMG_20150816_213249

आम्ही चौघे आणि माधुरी गुंटी उर्फ अम्मा, कृष्णा गुंटी आणि अत्रेय गुंटी असा गुंटी परिवार. ‘पॅराडाइज’ म्हणजे एकदम शाही. वातानुकुलित आणि चकचकीत. म्हणजे आपण कुठल्या तरी पंचतारांकित हॉटेलात आल्याचा भास होतो. गुळगुळीत फरशा नि सुटसुटीत टेबलांमधून वाट काढत आपण एखाद्या मोकळ्या टेबलापाशी पोहोचतो. एव्हाना बिर्याणीच्या घमघमाटानं नाकाबरोबरच मनाचा ताबाही घेऊन टाकलेला असतो. ‘चिकन बिर्याणी’ची ऑर्डर ठरलेली असते. फक्त किती मागवायची याचा हिशेब केला जातो. अलिकडे-पलिकडे, आजूबाजूला बिर्याणी सर्व्ह होत असताना आपण ती डोळ्यांनी खातच असतो. मला वाटतं कोणत्याही पदार्थाचा आस्वाद आपण सर्वप्रथम नाकानं घेतो. त्यानंतर डोळ्यांनी. पुढे बोटांनी त्याच्याशी खेळतो, अंदाज घेतो. नंतर जिव्हा पुरेपूर आस्वाद घेते. जिव्हेचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर मग क्षुधाशांति होते आणि मग मन तृप्त होते. यापैकी कोणतीही लिंक मध्येच तुटली की मग जेवणावरचं मन उडून जातं, असं मला वाटतं.

IMG_20150816_204739 IMG_20150816_205346

हुश्श… आजूबाजूच्या बिर्याणीचा आस्वाद घेत असतानाच आमची ऑर्डर येऊन पोहोचली. बिर्याणीची हंडी पाहून मला चमकायलाच झालं. बापरे किती ही बिर्याणी. अगदी ओतप्रोत भरलेली. ‘शादाब’च्या बिर्याणी बाबत सांगितलेली सर्व वैशिष्ट्ये इथंही अगदी तंतोतंत लागू. मला वाटतं वेटर लोकांना हैदराबादमध्ये विशेष प्रशिक्षणच देत असावेत, चमच्यानं चिकनच्या लेगपीसचे दोन तुकडे कसे करावेत याचं. इथल्या वेटरनंही अगदी लीलया चिकनची समसमान विभागणी करून बिर्याणी ‘सर्व्ह’ केली. शादाबच्या तुलनेत मसाला अगदी थोडा अधिक असला तरीही स्पायसी मात्र, अजिबात नाही. अगदी हलक्या स्वरुपाचा स्वाद. लेगपीस इतका मोठा असू शकतो आणि तो बिर्याणीमध्ये येऊही शकतो, हा अनुभव थक्क करून टाकणारा होता.

IMG_20150816_205409 IMG_20150816_205558

बिर्याणी सोबत दही आणि ग्रेव्ही मिळते. पण त्याची गरज पडत नाही. ज्यानं त्यानं आपापल्या आवडीप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा. मला फक्त बिर्याणीच आवडते. पिसेस नसतील, तर मग फक्त भात खाण्यापेक्षा ग्रेव्हीसोबत तो संपविण्याला प्राधान्य. भात नुसता जात नाही, यापेक्षा ग्रेव्ही संपविली पाहिजे, हा हेतू त्यात अधिक. बोलता बोलता दोन चिकन आणि एक व्हेज बिर्याणी कधी संपल्या हे कळलंही नाही. ‘खुब्बानी का मिठा’ हे पॅराडाइजचं वैशिष्ट्य. पण तो खाण्याइतकी भूकही कुणाला नव्हती. त्यामुळे ती ऑर्डर पुढच्या वेळेसाठी राखून ठेवली. हैदराबादमध्ये सहा-आठ ठिकाणी चांगली बिर्याणी मिळते. त्या प्रत्येक ठिकाणचा स्वाद वेगवेगळा आणि मोहक आहे, अशी माहिती कृष्णा गुंटी यांच्याकडून मिळाली. त्यामुळे ‘शादाब’ आणि ‘पॅराडाइज’मध्ये मनसोक्त बिर्याणी झोडल्यानंतर पुढची ट्रीप ‘कॅफे बहार’ आणि ‘बावर्ची’साठी राखून ठेवण्याचे नियोजन झाले. (कॅफे बहार आणि बावर्ची या दोन्ही ठिकाणी पुढील दौऱ्यादरम्यान स्वाती विशाल कुलकर्णी यांच्याकडून ‘ट्रीट’ मिळणार असल्याचे आश्वासन पदरात पडल्याने आम्ही निर्धास्त आहोत.)

तिसऱ्या दिवशी स्वातीकडे इडल्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्याचा योग होता. सोमवार असल्याने चिकन मिळणार नाही, अशी सक्त ताकीद देऊनच निमंत्रण मिळाले होते. त्यामुळे प्राणप्रिय इडलीवर ताव मारून श्रावणी सोमवार साजरा झाला. हैदराबादमध्ये असताना रोज घरची खिचडी किंवा आमटी-भात खायचा कंटाळा आला, की मग अम्माला घरी पाचारण करण्यात यायचं. कधी ती घरूनच पोळ्या करून आणायची किंवा मग आमच्या घरी येऊन चिकन वगैरे करून द्यायची. तिचं घर जवळ असल्यानं सकाळ-संध्याकाळी चहा-नाश्त्याला जाणं तर अगदी हमखास व्हायचं.

Idli-Sambar

स्वाती थोडी दूर राहत असल्यानं तिच्याकडं जाणं कमी व्हायचं. तरीही महिन्यातून एकदा भरपेट भोजनासाठी आमीरपेठ गाठली जायचीच. पोळी-भाजी, सांबार-भात आणि दिल्लीवाल्याची जिलेबी असा मेन्यू ठरलेला असायचा. म्हणजे साग्रसंगीत भोजन व्हायचं, अगदी भरपेट मनसोक्त. मी हैदराबाद सोडलं तेव्हा ‘ई टीव्ही’तील डेस्कवरील सहकाऱ्यांनी माझ्याबद्दलची त्यांची मते आणि शुभेच्छा लिहून पाठविल्या होत्या. स्वातीनं त्यावेळी लिहिलेल्या आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. स्वाती म्हणते, ‘जाड्या, तू गेल्यापासून मी महिन्याचा किराणा भरलेला नाही…’

तेव्हा आता अधूनमधून बिर्याणी झोडायला आणि स्वातीच्या घरचा किराणा संपवायला हैदराबादला जायलाच हवं…

‘दम’दार चिकन बिर्याणी…

अलप्पुळाची ट्रीप सत्कारणी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं केरळमध्ये गेलो, तेव्हाच केरळच्या पुढच्या ट्रीपचं निमंत्रण मिळालं होतं. काँग्रेसचं केरळमधलं मुखपत्र असलेल्या ‘विक्षणम’चा रिपोर्टर अनू व्हीएस आणि ‘केरळा कौमुदी’ची धडाकेबाज रिपोर्टर मंजू जॉय यांच्या ‘कल्याणम’चं अगदी आग्रहाचं निमंत्रण मिळालं होतं. (लग्नाला ‘कल्याणम’ हा कसला योग्य शब्दय ना!) आणि मी केरळच्या प्रेमात पडलो असल्यामुळं जाण्याचं तेव्हाच निश्चित केलं होतं. मला निमित्तच हवं होतं खरं तर.

IMG_20150430_112749 11208674_904386339621674_840785923856717970_n

अलप्पुळा (अल्लापुझ्झा नव्हे) इथं म्हणझे मंजूच्या घरीच लग्न होणार होतं. मंजू लॅटिन कॅथलिक आणि अनू हिंदू. दोघांनी रजिस्टर लग्न केलं आणि नंतर फक्त सगळ्यांसमोर मंगळसूत्र घालण्याचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर जेवण आणि मग ‘विदाई’. अगदी साध्या पद्धतीनं झालेलं लग्न. कोणताही तामजाम नाही, बडेजाव नाही की थाटमाट नाही. घराच्या बाजूलाच लग्नाचा मांडव आणि मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत भटारखाना.

वेगळी वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे जसं लग्नाला कॉन्ट्रॅक्ट देतात, तशीच पद्धत केरळमध्येही हळूहळू रुढ होत चालली आहे. शहरांप्रमाणे खेड्यांतही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला लोकप्रियता प्राप्त होऊ लागली आहे. मात्र, मंजूच्या लग्नात तिच्या शेजारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ‘मंगलकार्य’ पार पाडलं होतं. अनेकदा लग्नपत्रिकांवर लिहिलेलं असतं, की ‘कार्य सिद्धीस नेण्यास ‘श्री’ समर्थ आहेतच.’ मला राहून राहून वाटतं, की लग्नसमारंभात राबणारे हात असतात तेच खऱ्या अर्थानं ‘श्री्’ आहेत. कारण तेच मंगलकार्य म्हणजेच ’कल्याणम’ सिद्धीस नेत असतात.

IMG_20150430_072527

मंजूच्या लग्नात माझं लक्ष एकवटलं होतं, तिथल्या भटारखान्यावर. (अर्थातच!) शिफा’ज केटरिंगकडे जेवणाची सर्व व्यवस्था होती. मुख्य आचारी होता नासीर. निसार, शरीफ आणि शोभा हे तीन आणखी सहकारी. आदल्या दिवशी दुपारपासूनच लग्नाच्या जेवणाची लगबग सुरू होती. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार असले तरीही नॉनव्हेज पदार्थच मोठ्या प्रमाणावर बनविण्यात येत होते, हे सांगायला नकोच. चिकन दम बिर्याणी आणि बीफ फ्राय हे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी. पांढऱ्या भाताला पसंती देणाऱ्यांसाठी फिशकरी. तर शाकाहारींसाठी उकड्या तांदळाचा भात, कढी, थोरन (कोबीची केरळी पद्धतीने बनविलेली भाजी) आणि लोणचं. उन्हाळ्यामध्ये केळीची पानं मिळणं कठीण असतं आणि अर्थातच, दर जास्त असतात, म्हणून कागदी प्लेटमध्ये जेवण वाढण्यात येत होतं.

थोडक्यात म्हणजे चिकन दम बिर्याणी हा त्या दिवसाचा मुख्य मेन्यू होता. त्यामुळंच ७० किलो राजधानी बासमती राईस आणि ६० किलो चिकन वापरून जबरदस्त दम बिर्याणी बनविण्यात आली होती. केरळमध्ये मुस्लिम पद्धतीनं बनविलेली मलबार चिकन बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे. ही बिर्याणी मलबार चिकन बिर्याणीपेक्षा वेगळी असली, तरीही ‘अलप्पुळा स्टाइल’नी बनविलेली बिर्याणी मला प्रचंड भावली. म्हणजे स्वादही आणि त्याची बनविण्याची पद्धतीही.

IMG_20150429_171214 IMG_20150429_175252

आदल्या दिवशी दुपारी साधारण दोनच्या सुमारास चिकन बिर्याणीची तयारी सुरू झाली. सुरुवातीला चिकन छान साफसूफ करून धुवून घेण्यात आलं. नंतर तिखट-मीठ-मसाले लावून काही तासांसाठी मॅरिनेट करण्यात आलं. भटारखान्यात माझ्या एन्ट्रीपूर्वीच कांदा फ्राय करून ठेवला होता. जबरदस्त कुरकुरीत. तळलेल्या कांद्यामध्ये खसखस, काजू आणि बेदाणे मिसळून ते एका भांड्यात तयार करून ठेवण्यात आलं होतं. दोन-तीन तास मॅरिनेशननंतर चिकनचे पिसेस खोबरेल तेलामध्ये तळून घेण्यात आले. (मुद्दाम सांगण्याचा मुद्दा असा, की खोबरेल तेलात तळल्यामुळे विचित्र किंवा घाणेरडा वास येतो, असे अजिबात नाही. चवीत काहीही बदल कळत नाही.) खूप वेळ तळल्यामुळं त्याची धग आतपर्यंत गेली होती आणि चिकन मस्त शिजलं होतं. त्यामुळं लालचुटूक चिकन फ्राय टेम्प्टिंग तर होतंच. पण अफलातून टेस्टीही होतं. चिकनचा पिस टेस्ट करण्यासाठी देण्याइतकी माझी आणि शरीफची दोस्ती एव्हाना झाली होती. साठ किलो चिकन फ्राय करून घेतल्यानंतर त्यानं विश्रांती घेतली.

IMG_20150429_175430 IMG_20150429_191825

IMG_20150430_065058 IMG_20150429_165853

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता चुली पेटल्या. तीन ते चार चुलींवर सगळा खेळ होता. बीफ फ्राय, थोरन, अननसाचं सरबत, कढी वगैरे पदार्थ साइड बाय साइड सुरू असले तरीही माझं लक्ष अर्थातच, चिकन दम बिर्याणीवर खिळून होतं. सकाळी सकाळी नासीरनं बिर्याणीतील चिकन मसालासाठी ग्रेव्ही तयार करायला घेतली. बारीक चिरलेला कांदा खोबरेल तेलात टाकून परतायला सुरुवात केली. कांदा खरपूस लाल झाल्यानंतर मग त्यामध्ये आधी हळद टाकली. नंतर कांद्याची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट आणि मिरचीचा ठेचा घालून परतायला लागला. हे सगळं मिश्रण परतून एकजीव झाल्यानंतर त्यानं त्यात तीन गोष्टी टाकल्या. पहिलं म्हणजे दोन बाटल्या टोमॅटो सॉस. एक बाटली सोया सॉस आणि तिसरं म्हणजे सुमारे अर्धा लीटर गुलाबपाणी. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर मग त्यात दही टाकलं आणि नंतर सर्वात शेवटी मीठ.

IMG_20150430_065153 IMG_20150430_071446

IMG_20150430_071613 IMG_20150430_071900

IMG_20150430_073815 IMG_20150430_074458

चिकनची ग्रेव्ही तयार झाल्यानंतर मग त्यात आदल्या दिवशीच फ्राय करून ठेवलेले चिकनचे पिसेस टाकले. टाकले म्हणजे काय अक्षरशः दोन पातेल्यात दोन टोपल्या ओतल्या. ग्रेव्ही आणि चिकन यांची सरमिसळ चांगल्या पद्धतीनं व्हावी, यासाठी चुलीची धग वाढविण्यात आली. आणखी थोडं सरपण त्यात घालण्यात आलं. दोन चुलींवर चिकन मसाला तयार करण्यात येत असतानाच दुसरीकडे आणखी दोन चुलींवर राजधानी बासमती राइस शिजविण्यात येत होता. तांदूळ अर्धवट शिजला आहे, याची खात्री झाल्यानंतर तो टोपल्यांमध्ये काढून ठेवण्यात आला. जेणेकरून त्यातील पाणी बाहेर निघून जाईल. आणखी एका मोठ्या पातेल्यात मीठ घातलेलं पाणी उकळतच होतं. त्यामध्ये हा अर्धवट शिजलेला तांदूळ ओतण्यात आला. जेणेकरून भाताला मिठाची चव लागावी. अर्धवट शिजलेला सर्व तांदूळ या पातेल्यात ओतल्यानंतर त्यामध्ये मसाला टाकण्यात आला. काळी मिरी, वेलदोडे, लवंग, दालचिनी आणि आणखी एक-दोन जिन्नस. मसाला पाण्यात पडल्यानंतर काही मिनिटांतच त्याचा घमघमाट सर्वत्र दरवळू लागला.

IMG_20150430_080706 IMG_20150430_081122

IMG_20150430_081141 IMG_20150430_081356

अवघ्या काही मिनिटांमध्ये तांदूळ पूर्णपणे शिजला आणि भात तयार झाला. पाच-दहा टक्के भात शिजायचा राहिला असावा. मग हा भात टोपलीने उचलून त्यातील पाणी काढून चिकन मसाल्याच्या दोन्ही पातेल्यांमध्ये समसमान ओतण्यात आला. त्यामध्येही एक शिस्त होती. अर्थात, तयार चिकन मसाल्यावर पहिल्यांदा तळलेला कुरकुरीत कांदा-खसखस-काजू-बेदाणा यांचे मिश्रण पखरण्यात आलं होतं. त्यावर लाल तिखट (मिरची पावडर) पसरण्यात आली होती. त्यानंतर त्यावर भात ओतण्यात आला. एकेक टोपली भात ओतल्यानंतर त्यावर पुन्हा कुरकुरीत तळलेला कांदा-खसखस-काजू नि बेदाण्याचं मिश्रण पखरण्यात येत होतं. नंतर पुन्हा एक टोपली भात. अशा चार-पाच थरांनंतर पातेलं भरलं. मग पुन्हा एकदा त्यावर तळलेला कांदा आणि खसखस यांची पखरण करण्यात आली. उरलेले सर्व काजू आणि बेदाणे टाकण्यात आले.

IMG_20150430_082601 IMG_20150430_082604

IMG_20150430_082705  IMG_20150430_082731

हा कार्यक्रम संपल्यानंतर मग भातावर पातेलंभर तूप ओतण्यात आलं. दोन्ही पातेल्यांमध्ये गाईच्या तुपाचा एकेक डबा ओतण्यात आला. मग नासीरनं भातामध्ये पाच-सहा ठिकाणी वरपासून खालपर्यंत बाबूं खुपसून पोकळी तयार केली. कदाचित चिकन मसालाचा स्वाद वरपर्यंत यावा, यासाठी हा प्रयोग असावा. हे सर्व झाल्यानंतर मग भाताच्या दोन्ही पातेल्यांना दम लावण्यात आला. दम म्हणजे मैदा मळून ते पीठ पातेलं आणि वरच्या झाकणीला लावतात. म्हणजे निर्माण होणारी वाफ आणि स्वाद बाहेर पडणार नाही. उलट ती आतच राहील. दम लावून झाल्यानंतर मग पुन्हा एकदा चुलीला हवा आणि सरपण देण्यात आलं. पातेल्यावर ठेवलेल्या थाळीवरही निखारे पसरण्यात आले. जेणेकरून वर ओतलेलं तूप वितळून खालपर्यंत जाईल. चिकनचा ग्रेव्ही आणि भात शिजविताना टाकलेला काळा मसाला यांचा स्वाद एकमेकांमध्ये छान मिसळून जाईल आणि खऱ्या अर्थाने चिकन दम बिर्याणीचा स्वाद आपल्याला चाखता येईल…

IMG_20150430_083604 IMG_20150430_083727

IMG_20150430_083748 IMG_20150430_084257

साधारण अर्धा तास पेटलेल्या चुलीवर दोन्ही पातेली होती. नंतर चुलीतील पेटती लाकडं काढून घेण्यात आली आणि मंद आचेवर दोन्ही पातेली तास-दीड तास राहतील, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. लग्न लागल्यानंतर सर्व समारंभ पार पडल्यानंतर जेव्हा पंक्ती बसायची वेळ आली, तेव्हाच नासीरनं दम काढला आणि मग एका बाजूचा भात काढून एका परात वजा पसरट पातेल्यात पसरायला सुरूवात केली. पातेल्यावरची झाकणी काढल्यानंतर जो काही गंध पसरलाय की विचारता सोय नाही. दरम्यानच्या काळात, नासीर आणि निसार एका बाजूचा सर्व भात त्या पसरट भांड्यात काढत होती. त्यामुळं खालचा चिकनचा थर नजरेस पडायला लागला होता. मग पाच-सहा तरसाळ्यांमध्ये एका बाजूला भात आणि साइडला चिकन मसाला ठेवण्यात आला. मंजूचे मित्र आणि शेजारी ती तसराळी घेऊन पंगतीमध्ये चिकन बिर्याणी वाढण्यासाठी नेऊ लागली.

IMG_20150430_121811 IMG_20150430_122014

IMG_20150430_122124 IMG_20150430_122346

चिकन दम बिर्याणी जबरदस्त स्वादिष्ट झाली आहे, हे समजण्यासाठी पंगती बसण्यापर्यंत थांबावं लागलं नव्हतं. जेवणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकण्यापूर्वीच बिर्याणीच्या घमघमाटानंच त्याची पोचपावती मिळाली होती.

‘बीफ फ्राय’ एकदम सही

चिकन दम बिर्याणीच्या जोडीला बीफ फ्रायही होतं. केरळमध्ये फक्त ब्राह्मण समाज सोडला तर बहुतांश हिंदू लोकही बीफ खातात, असं ऐकायला मिळालं. म्हणजे लग्नाला आलेले मंजूचे अनेक मित्र, नातेवाईक आणि पाहुणे मंडळी आवर्जून बीफ फ्राय मागून घेत होते. हे बीफ गाय, बैल किंवा म्हशीचं नव्हतं, तर रेड्याचं होतं. मंजूनं मला आवर्जून सांगितलं होतं, की आम्ही मेल बफेलोचं मीट बीफ म्हणून वापरतो. (हिंदी किंवा इंग्लिशमध्ये रेड्याला काय म्हणतात, हा तिचा आणि माझ्या पुढील यक्षप्रश्न.)

IMG_20150430_064932 IMG_20150430_082143

सकाळी साधारण दहा वाजल्यापासून बीफ शिजायला ठेवलं होतं. हळद आणि दही घालून पहिल्यांदा त्याला मॅरिनेशन करण्यात आलं आणि नंतर तीन-चार तास चुलीवर रटारटा शिजविण्यात आलं. नंतर त्यात खोबऱ्याचे काप घालण्यात आले. अखेरीस मीठ-मसाला घालून बीफ फ्राय तयार करण्यात आलं. बीफ तयार करण्याच्या हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या पद्धती निरनिराळ्या आहेत. आता मंजूच्या लग्नात करण्यात आलेलं बीफ हे ख्रिश्चन पद्धतीनं केलेलं होतं, की हिंदू की मुस्लिम हे मला कळलं नाही. पण ते झालं होतं स्वादिष्ट हे मात्र नक्की…

IMG_20150430_082231 IMG_20150430_122458

IMG_20150430_122525 IMG_20150430_122804

अर्थात, आपल्याला वाटतो तसा ‘बीफ फ्राय’ हा भोजनाचा मुख्य भाग किंवा महत्त्वाचा घटक नव्हता. तो लोणच्यासारखा भाताला लावून खाण्यासाठी तयार करण्यात आलेला पदार्थ अशाच स्वरुपाचा होता. गेल्या वेळी केरळला गेलो होतो, तेव्हा खाल्लेल बीफ थोडंसं कमी शिजलेलं किंवा काही पिसेस हे रबरासारखे वाटत होते. अर्थात, ते ‘बीफ मसाला’ होतं आणि यावेळी ‘बीफ फ्राय’ खाल्लं. ‘बीफ फ्राय’ हीच केरळी ख्रिश्चनांची खासियत आहे. त्यामुळे यावेळी बीफचा अनुभव भलताच उत्तम होता. खूप वेळ आणि चुलीवर शिजविलेलं असल्यानं ते अगदी मऊ झालं होतं आणि स्वादाची तर बातच विचारू नका.

अलप्पुळाची ‘दम’दार चिकन बिर्याणी आणि बीफ फ्राय यांच्यामुळं केरळ दौऱ्याची सांगता अफलातून झाली, हे मुद्दाम सांगायला नकोच…

आमरस पुरणपोळी…

अफलातून जोडी, वाढवी जेवणाची गोडी

सर्वत्र रणरणतं ऊन. उन्हानं होणारी जिवाची काहिली. तहानेमुळं कासावीस होणारा जीव आणि थंडगार काहीतरी घशाखाली उतरावं म्हणून चाललेली धडपड. वातावरण रखरखीत. सकाळी दहा काय आता तर आठ वाजल्यापासूनच सूर्यदेव तापलेले. अजिबात घराबाहेर पडावसं वाटू नये, असंच वातावरण. मी हे सर्व उन्हाळ्याबद्दल बोलतोय, हे सर्वांच्या लक्षात आलं असेलच.

असं सगळं असलं तरी लहानपणी दोन-तीन कारणांमुळे उन्हाळा आवडायचा. त्यापैकी एक म्हणजे दीड-दोन महिने मिळणारी सुटी. मात्र, आता ती सोयही उरलेली नाही. कामावर जावंच लागतं. आणखी एक कारण म्हणजे आइस्क्रिम. ही गोष्ट पूर्वी उन्हाळ्यामध्येच मिळायची. आता मात्र, आइस्क्रिमलाही उन्हाळ्याचं बंधन राहिलेलं नाही. उलट हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे फॅड भलतंच लोकप्रिय झालं आहे. त्यामुळं ते कारणही वासलात निघालंय. त्यामुळं उन्हाळा आवडण्याचे आता एकमेव कारण शिल्लक आहे आणि ते म्हणजे आंबा.

‘आम अब हर मौसम मिले है…’ वगैरे जाहिरातीत म्हणायला आणि दाखवायला ठीक आहे. भैय्या लोकांना आंब्याऐवजी आंब्याचे सॉफ्ट ड्रिंक आवडतही असेल. आम्हाला मात्र, आंबाच हवा. आंब्याला पर्याय असू शकतो हे मान्यच नाही. उन्हाळ्यात आंबे खाल्ले नाहीत, तर आख्खं वर्ष रखरखीत जातं बुवा आमचं, अशी परिस्थिती. हापूस, पायरी, गावठी, तोतपुरी, बदाम, केसर, नीलम, मलगोबा किंवा मिळेल तो आंबा घोळून तोंडाला लावणं हा अनेक वर्षांचा परिपाठ झालाय. आंबा कापून फोडी करून वगैरे (तोतापुरीचा अपवाद वगळता) आम्हाला मान्यच नसतं. किंवा आंबा ही गोष्ट कापून खाण्याची गोष्टच नाही, असं आमचं प्रामणिक मत.

smita_keri

आंबा चोखून खाण्यात जी मजा आहे, ती आलम दुनियेत कशात नाही. त्याला वयाचं बंधन नाही. त्यानंतर मग आमरस-पुरी वगैरेचा क्रमांक लागतो. गर्रमागर्रम पुऱ्या किंवा तव्यावरच्या पोळ्या यांच्या बरोबर आमरस खाण्यात जी मजा आहे, ती नुसत्या वर्णनातून समजणारी नाही. प्रत्यक्ष आस्वादच आवश्यक आहे. आमरस पुरी यथेच्छ हाणल्यानंतर मग एक-दोन वाट्या नुसता आमरस चालू शकतो. आंब्याचा मिल्कशेक, आंब्याचे आइस्क्रिम, आंबा मस्तानी, आंब्याची पोळी, आंब्याची बर्फी, आंब्याची वडी नि आंब्याचे मावा मोदक असे अनेक पदार्थ आंब्यापासून बनतात. उन्हाळ्यात त्यांची चलती असते. आंब्याचे मावा मोदक मात्र, गणपतीतच जास्त खपतात.

हल्ली अगदी मोजक्या ठिकाणी आंब्याचे उकडीचे मोदक असे प्रयोगही केले जात आहेत. अर्थात, त्याला म्हणावी तितकी लोकप्रियता मिळालेली नाही. मागे मुंबई आणि डोंबिवलीत आंब्याचे मोदक खाल्ले होते. अमित भिडेच्या लग्नात आंब्याचे मोदक हा प्रकार सर्वांनी अनुभवला होता. (माझी मात्र, ती संधी हुकली होती.) पुण्यात अजून तसा योग आलेला नाही. हा पदार्थही एकदम भन्नाट लागतो. आमरस उपलब्ध असला तरीही मोदकामध्ये आंब्याचा पल्प वापरण्याची पद्धतच अधिक रुढ आहे. तांदळाच्या पिठाची उकड काढताना त्यामध्ये आंब्याचा पल्प टाकायचा. उकड नि आंब्याचा पल्प एकजीव होईल, असं बघायचं. मोदकाचं सारण करताना त्यात गुळाऐवजी साखर घालायची आणि आंब्याचा पल्पही घालायचा. म्हणजे खऱ्या अर्थानं आमरसाचे मोदक तयार बनतील.

अर्थात, आमरस किंवा आंब्याचा पल्प यापैकी काहीही सारणामध्ये घालायचं असेल, तरी ते थोडं गरम करून घोटवून घ्यायला पाहिजे. म्हणजे ते अधिक घट्ट होईल आणि सारणाबरोबर अधिक चांगल्या पद्धतीने एकजीव होईल. गरम करून घोटवलं नाही, तर कदाचित मोदकांचा बेत फसण्याची शक्यताच अधिक.

आंब्याच्या मोदकांपेक्षा मला पुरणपोळी आणि आमरस हे कॉम्बिनेशन अधिक भन्नाट वाटतं. म्हणजे कसं यात पुरणपोळीचा स्वादही आहे आणि आमरसाची मजाही आहे. मोदकात कसं सारणाची स्वतंत्र चव रहात नाही. त्यातच आंब्याचा स्वाद मिसळला जातो. मात्र, पुरणपोळीचं तसं नाही. पुरणपोळीत गुळाची गोडीही आहे आणि जोडीला आमरसाचा गोडवाही आहे. म्हटलं तर दोन्ही पदार्थ स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखून आहेत, म्हणावं तर एकमेकांमध्ये मिसळून गेलेलेही आहेत. त्यामुळंच हे कॉम्बिनेशन मला जबरस्त वाटतं.

IMG_8805

आमरस-पुरणपोळी लक्षात राहण्याचं कारण म्हणजे नाशिक. साम मराठीच्या लाँचिंगपूर्वी महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये जाण्याची संधी मिळाली. कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर आणि होमटाऊन पुणे. हेतू दोन. एक तर वेगवेगळ्या ठिकाणच्या रिपोर्टर्सना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि दुसरा हेतू म्हणजे उत्तम स्टोऱ्यांची बँक तयार व्हावी. मार्गदर्शन टॉड बेअर, दौऱ्यांच्या पूर्वार्धात अमेय पोळेकर आणि उत्तरार्धात आनंद गायकवाड बरोबर होते. स्थानिक रिपोर्टर निशिकांत तोडकर (कोल्हापूर), सुनीत भावे नि स्वप्नील बापट (पुणे) आणि महेंद्र महाजन (नाशिक) यांनी निवडक स्टोरीज प्लॅन केल्या होत्या. त्यानुसर त्या कशा शूट करावयाच्या, स्क्रिप्टिंग कसे हवे वगैरे गोष्टी टॉड बेअर शिकविणार होते. तेवढीच आमचीही शिकवणी नि उजळणी…

या निमित्ताने नाशिकला जाणं झालं आणि आमरस-पुरणपोळीचा ‘मेन्यू’ गवसला. सात-आठ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये खाल्लेल्या पुरणपोळी-आमरसाची आठवण अजूनही ताजी आहे. म्हणजे बातमीसाठी स्टोरी वेगळी असावी, म्हणून घेतलेले कष्ट, वेगवेगळे शॉट्स, पीटूसीमध्ये काय पाहिजे, टेक-रिटेक असंही सगळं आठवतंय. पण सर्वाधिक लक्षात राहिलीय आमरस-पुरणपोळी.

वेगवेगळ्या स्टोरीज केल्यानंतर आम्ही नाशिक सोडण्याच्या आदल्या दिवशी दातीर कुटुंबियांची स्टोरी करण्यासाठी गेलो होतो. टॉड बेअर, मी, महेंद्र महाजन, आनंद गायकवाड आणि कॅमेरामन सतीश काळे होतो. नाशिकजवळच्या मुंढे गावातील दातीर कुटुंबीय. एका कुटुंबात साठ-सत्तर जणं. इतकं असूनही सगळे गुण्यागोविंदानं नांदतायेत, अशी स्टोरी होती. पुरणपोळी करतानाचे व्हिज्युअल्स, आई-वडिलांचे बाईट्स, बायाबापड्यांचे बाईट्स, लहानग्या मुलानं गायलेलं ‘आम्ही आगऱ्यांची लेकरं…’ हे गाणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराच्या दारातून बाहेर येत पीटूसी करणारे महेंद्र महाजन (आयडिया टॉड बेअर)… असं सगळं काही आटोपल्यानंतर पंक्तीची तयारी सुरू झाली. सकाळी लवकर नाश्ता आणि चहा झालं होतं. मात्र, नंतर काहीच नाही. त्यामुळं पोटात कावळे कोकलून कोकलून शांत झालेले.

index

खवळून भूक लागली होती. त्यामुळं कधी जेवायला बसतोय, असं झालं होतं. पुरणपोळीचा बेत होता, हे माहितीच होतं. त्यानुसार भात, भाजी, कटाची आमटी, भजी आणि कुरडया असे आजूबाजूचे पदार्थ दाखल झाल्यानंतर जेवायला सुरुवात केली. भात संपता संपता पुरणपोळी आली. शहरात किंवा घरी तयार होणाऱ्या पुरणपोळीच्या तुलनेत भली मोठी. खापरावरची होती की तव्यावरची माहिती नाही. पण खूप मोठी होती एवढंच आठवतंय.

पुरणपोळी खायला सुरुवात करणार तेवढ्यात दातीर मंडळी म्हणाली, ‘थांबा. आमरस येतोय.’ मी चाट पडायच्या बेतात होतो. पुरणपोळीच्या जोडीला तूप असतंच. सोबतीनं दूध किंवा कटाची आमटी यापैकी एखादा ऑप्शन लोकं स्वीकारतात. दूध मला आवडत नाही. त्यामुळं पुरणपोळी आणि कटाची आमटी असेल तरी आपण खूष. पण इथं वेगळाच प्रयोग चालला होता. अखेरीस आमरसाचं पातले घेऊन मावशी आल्या. मला पुरणपोळी उघडायला सांगितली. त्यावर आमरसाचे दोन डाव ओतले आणि म्हणाल्या, ‘आता करा सुरुवात.’

बाप रे… गोडाचा भडिमार. नुसता नाही अतिभडिमार. आधीच पुरणपोळी गोड. त्यावर आमरस. म्हणजे प्रचंड अवघड काम. आमरसात पुरणपोळी कुस्करायची आणि मग खायची. कारण आमरस थेट पुरणपोळीवरच ओतलेला. वाटीमध्ये बाजूला आमरस आणि मग पोळीला लावून आमरस खाल्लाय वगैरे अशी संधीच नाही. त्यामुळे पुरण आणि आंबा एकमेकांमध्ये मिळून मिसळून मगच आपल्या पोटात जाणार. पुरण आणि आंबा अशा दोन भिन्न चवींमधून एक वेगळीच पण आणखी चांगली चव तयार झालेली.

pooran-poli-022-001

बरं, एका पुरणपोळीत आम्ही गार होणार हे माहिती होतं. तरीही यजमानांच्या आग्रहाखातर आणि प्रेमाखातर आणखी एक पुरणपोळी खावी लागणार, याचा अंदाज आलाच होता. तसंच झालंही. पुरणपोळी आणि आमरस यांचं आणखी एक आवर्तन झालं. आणखी एक आवर्तन कसंबसं रोखलं. वेळीच शहाणपणा केला म्हणून भात, भाजी, कुरडया, भजी वगैरे पदार्थ होते तेवढे संपविले होते आणि परत त्याच्या मोहात पडलो नव्हतो. त्यामुळं कसंबसं निभावून नेलं. पण बोट लावेपर्यंत जेवणं म्हणजे नेमकं काय, याचा प्रत्यय नाशिकच्या मुंढे गावात आला.

नुसत्या पुरणपोळीच्या जोडीला आमरस असेल, तर स्वर्गसुख खऱ्या अर्थानं अनुभवता येतं, हे कळून चुकलं. त्यानंतर तसं स्वर्गसुख अनुभवायची संधी मिळाली नाही. तुम्हाला जर अशी संधी मिळाली तर जरूर त्याचा लाभ घ्या. (आणि आम्हालाही बोलवायला विसरू नका…)

ता. क. – काही वर्षांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील ‘हॉटेल सवाई’मध्ये ‘आमरस-पुरणपोळी’ हा पदार्थ ‘मेन्यू कार्ड’मध्ये होता. उन्हाळ्यापुरताच. मात्र, त्याची चव चाखलेली नाही. त्यामुळे तिथं आमरस-पु्रणपोळी हा पदार्थ मिळतो, तो कसा आहे, याबद्दल माहिती नाही. पण तिथं तेव्हा मिळत होता. आता, विचारणा केली पाहिजे…

(‘महाराष्ट्र टाइम्स’मधील पुरवणीत छापून आलेला लेख सविस्तर स्वरुपात…)

टुंडे के कबाब, ठंडाई, मिश्रांबू आणि टोमॅटो चाट

चलो भैय्या… उत्तर प्रदेश!

गेल्या वर्षी साधारण याच सुमारास लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं लखनऊला गेलो होतो. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचे पहिले दहा दिवस उत्तर प्रदेशात होतो. सगळीकडे प्रचंड उन्हाळा. भर उन्हात फिरताना तब्येत व्यवस्थित रहावी, यासाठी खादाडीवर खूप बंधनं स्वतःहूनच घालून घेतली होती. ‘लिक्विड डाएट’वर जोर होता. मात्र, लखनऊमध्ये ‘टुंडे के कबाब’ न खाताच परतणं मान्य नव्हतं. त्यामुळं चमचमीतपणाचा तेवढाच अपवाद वगळता खाद्यात्रा अगदी साधी होती. लखनऊ आणि वाराणसीसह छोट्या-मोठ्या शहरांमधील ही खाद्यभ्रमंती…

IMG_20140430_204723 IMG_20140430_195628
‘टुंडे के कबाब… लाजवाब’
लखनऊ जसं नवाबांचं म्हणून प्रसिद्ध आहे, तसंच ते कबाबासाठीही प्रसिद्ध आहे. मुघल सम्राटांनी कबाबला राजाश्रय दिला. लखनऊच्या या कबाबांची ओळख सर्वदूर भारतभर पोहोचविली ‘टुंडे के कबाब’नं. एकशे पाच वर्षांची स्वादिष्ट परंपरा लाभलेलं. ‘टुंडे के कबाब’वर ताव मारण्याची संधी सोडणं थोडंसं अवघड होतं. व्यग्र वेळापत्रक, प्रचंड उन आणि वातावरण प्रतिकूल गोष्टी असूनही अमीनाबाद परिसरातील ‘टुंडे के कबाब’ला भेट देण्यासाठी आवर्जून वेळ काढला.

अमीनाबादच्या मुख्य चौकात पोहोचल्यानंतर आपण एका गल्लीत प्रवेशतो. तिथं दोन्ही बाजूला कबाब आणि मांसाहारी जेवण मिळणारी हॉटेल्स आहेत. कोळशावर भाजत ठेवलेले सीक कबाब आणि तंगडी कबाब यांचा खरपूस गंध आपल्या नाकात अक्षरशः घुसतो. नुसता नाकात घुसत नाही, तर तो आपल्या मनाचा ताबा घेतो. लागलेली भूक आणखी खवळवतो.

IMG_20140430_195726 IMG_20140430_204509

टुंडा म्हणजे फक्त एक हात असलेली व्यक्ती. मुराद अली नावाचा मुख्य आचारी या ठिकाणी काम करीत होता. त्याला फक्त एकच हात होता. त्याचं टोपणनाव ‘टुंडा’ असं होतं. त्यावरून ‘टुंडे के कबाब’ अशी ओळख त्याला मिळाली. घरगुती मसाले वापरून वेगवेगळ्या प्रकारचे कबाब इथं केले जातात. पहिल्यापासून घरातील महिलांनी केलेले मसालेच इथं वापरण्यात येतात. तेच कबाबच्या लोकप्रियतेचं गमक असल्याचं मानलं जातं. विविध प्रकारच्या कबाबसाठी जवळपास १६० वेगवेगळ्या पदार्थांपासून निरनिराळे मसाले तयार केले जातात. मात्र, हे मसाले कशापद्धतीनं बनवितात, हे अजूनही गुपितच आहे. ते गुपित आहे, म्हणूनच ‘टुंडे के कबाब’चं वेगळेपण टिकून आहे.

मटण आणि बीफ अशा दोनच मुख्य प्रकारांमध्ये कबाबची विभागणी करण्यात आलेली आहे. तंगडी कबाब, काकोरी कबाब, शमी कबाब, बोटी कबाब, सीक कबाब, घुटवा कबाब वगैरे वैविध्यही आहे. मात्र, गलावटी प्रकारात दोनच प्रकारचे कबाब उपलब्ध असतात. मटणाचे शक्य तितके बारीक तुकडे करायचे. मग त्यात साधं दही, गरम मसाले, आलं-लसूण, कोथिंबीर, लवंग आणि इतर गरम मसाले, तूप, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, चवीला मीठ-साखर आणि व्हिनेगार असे सर्व पदार्थ घालून ते सगळं एकजीव करून घ्यायचं. मग मिश्रणाचे गोलाकार चपटे कबाब करायचे आणि ते शॅलो फ्राय करून सर्व्ह करायचे. अर्थात, चिकन आणि बीफ कबाब वेगवेगळ्या भट्टीत पण शेजारी शेजारीच तयार करतात. ही परिस्थिती मान्य असणाऱ्या व्यक्तीच तिथं एन्जॉय करू शकतात.

अत्यंत मऊसूत असे हे कबाब तोंडात ठेवल्या क्षणी ‘जन्नत’, शिवाय दरही अगदीच कमी. तोंडात ठेवल्यानंतर लगेचच कबाब विरघळतो, असं म्हटलं तरी हरकत नाही. शिवाय कबाब गरमागरम असल्यामुळं त्याचा स्वाद आणखीनच ‘बढिया’ लागतो. पाहाता पाहाता कबाबची प्लेट कधी रिकामी होते, हे समजतही नाही. आम्ही कबाब रोटीबरोबर खाण्याऐवजी आम्ही शिरमाल मागविला.

IMG_20140430_195821 IMG_20140430_195903

शिरमाल म्हणजे रोटीचाच एक वेगळा प्रकार. मैदा, तूप आणि दूध यांच्यापासून रोटीच्या आकाराचा शिरमाल तयार करतात. त्यावर केशराचं पाणी लावून मग ते तंदूर भट्टीत ठेवतात. खरा शिरमाल असा तयार करतात. ‘टुंडे के कबाब’मध्ये शिरमालला केशराचं पाणी लावलं होतं, की नुसताच केशरी रंग होता देव जाणे. कबाबच्या बरोबरच बिर्याणी, बार्बेक्यू, मटण कुर्मा, शाही चिकन मसाला, हे पदार्थही मिळतात. कबाब-शिरमालवर ताव मारल्यानंतर आम्ही हाफ चिकन शाही मसाला मागवला. दोघांमध्य हाफ. मटण कोरमा आणि तंदूरपेक्षा शाही चिकन आम्हाला जास्त पसंत पडलं. दोघांमध्ये संपता संपेना इतकी क्वांटिटी. टुंडेच्या कबाबांचा फडशा पडल्यानंतर शाही चिकन मसालावर मंडळी तुटून पडली.

IMG_20140430_201949 IMG_20140430_203919

‘टुंडे’मधून निघताना आम्ही अवधी खीर मागवून शेवट गोड करण्याचं ठरविलं. बारीक दळलेला तांदूळ, दूध आणि साखर यांच्यापासून बनविलेला गोड आणि घट्ट खीर मातीच्या छोट्या वाडग्यातून समोर आली. काश्मिरी फिरनी थोडी पातळ आणि अधिक गोड वाटते. त्या तुलनेत अवधी खीर एकदम घट्ट आणि कमी गोड.

IMG_20140430_210949 IMG_20140430_195651

‘टुंडे के कबाब’चा इतिहास
लखनऊचा एक नबाव कबाबचा प्रचंड चाहता होता. त्याला कबाब खूप आवडायचे. मात्र, दातांची बिकट अवस्था आणि नाजूक प्रकृती यामुळं त्याला कबाबचा आनंद लुटता येत नसे. त्यानं एक स्पर्धा आयोजित केली. लखनऊमध्ये सर्वाधिक मऊ आणि रसरशीत कबाब निर्माण करणाऱ्या कबाबवाल्याला राजाश्रय देण्याची घोषणा केली. या स्पर्धेत हाजी मुराद अली यांचे कबाब सर्वोत्तम आणि स्वादिष्ट ठरले. एक हात नसलेला याच कबाबवाल्याचा जॉइंट पुढे ‘टुंडे के कबाब’ म्हणून ओळखला जाऊ लागला. लहानपणी पतंग उडवत असताना हाजी मुराद अली हे गच्चीवरून पडले आणि त्यात त्यांचा एक हात कापावा लागला. त्यांनी शंभर वर्षांपूर्वी कबाब विकण्यासाठी एक छोटा स्टॉल लावला. त्यांच्या आता भारतभर फ्रँचायझी आहेत. पुण्यात या राव आमच्या…

IMG_20140430_205055

कुल्फी विथ शेवई…
टुंडे के कबाब खाल्ल्यानंतर बाहेरच्याच ठेल्यावरून पान तयार करून बांधून घेतलं. कारण आम्हाला अजून कुल्फी खायची होती. मग थोडंसं पुढे जाऊन ‘प्रकाश कुल्फी’मध्ये जाण्यासाठी निघालो. तसे तिथं चार-पाच कुल्फीवाले आहेत. काही गाड्याही आहेत. मात्र, प्रकाशची कुल्फी फेमस आहे, असं लखनऊला माझा नव्याने मित्र झालेल्या गणेशनं सांगितलं. केशर-पिस्ता कुल्फी ऑर्डर केली. कुल्फी नेहमीसारखीच पण सजावट वेगळी. रंगीबेरंगी शेवयांची पखरण करून त्यावर दूध वगैरे टाकून आपल्याला ‘सर्व्ह’ करतात. कुल्फी एकदम जबरदस्त आणि ‘टुंडे के कबाब’ रिचविल्यानंतर आणखीनच भारी. चमचमीत कबाबनंतर थंडगार शाही कुल्फी. पण शेवयांची पखरण नि दूधाची उपस्थिती अनावश्यक. एक वेगळा अनुभव म्हणून एकदा खायला हरकत नाही. पण दुसऱ्यांदा गेल्यानंतर ‘शेवया वगैरे नको रे बाबा. फक्त कुल्फीच दे,’ असंच नक्की सांगेन.

कडक उन्हाळा आणि वारंवार लागणारी तहान यामुळं तेलकट आणि मसालेदार पदार्थ शक्य तितके कमी खाण्यावर माझा भर होता. कारण उत्तर प्रदेशचा दौरा प्रकृतीच्या कारणामुळे अर्धवट टाकून परतावे लागू नये, म्हणून मी अधिकच खबरदारी बाळगत होतो. त्यामुळं लिक्विड पदार्थांवर अधिक भर होता…

IMG_20140505_122453

बहारदार मिश्रांबू…
वाराणसीमध्ये असताना मिश्रांबू आणि ठंडाई या दोन पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. मिश्रांबू म्हणजेच स्पेशलाइज्ड ठंडाई. एका दुकानदाराने स्वतंत्र आणि विशेष फॉर्म्युला वापरून तयार केलेली ठंडाई. ठंड दूध, केशराचा इसेन्स, केशर-पिस्त्याची पेस्ट, माव्याची पेस्ट, खवा, गोडपाणी आणि भरपूर मलई टाकून मिश्रांबू तयार केलं जातं. हे सर्व पदार्थ एकत्र करून मग ते ग्लासमध्ये चमच्याने छान एकजीव केले जातात. दोन ग्लासमध्ये घालून ते मस्त हलवलं जातं आणि शेवटी काचेच्या भल्यामोठ्या ग्लासमध्ये ते दिलं जातं. मिश्रांबू हा प्रकार एकदम बहार आणणारा. मात्र, ते पिण्याच्या आधी आणि नंतर किमान काही तास तरी तुम्ही अधिक काही खाल्लेलं नसणं आवश्यक आहे. अन्यथा त्याचा खराखुरा आनंद तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ते इतकं जड असतं, की पुढचे काही तास भूक तुमच्या आसपासही फिरकत नाही.

ठंडगार ठंडाई…
वाराणसीमध्ये गोदोलिया भागामध्ये माझं हॉटेल होतं. त्याच चौकात तीन-चार ठेल्यांवर ठंडाई मिळत होती. त्यापैकीच कुठल्या तरी एका ठेल्यावर गेलो. बहुधा आदल्या दिवशी ‘मिश्रांबू’ प्यायलं होतं, त्याच्याच ठेल्यावर. मस्त ठंडाई बनवाला सांगितली. ठंडाईच्या निरनिराळ्या फ्लेव्हर्सचा अर्क तयार असतो. बदाम, बडीशेप, खसबस, टरबुजाच्या बिया, अगदी नावाला मिरी, वेलची आणि गुलाबपाणी यांच्यापासून ठंडाईचा अर्क तयार करण्यात येतो. केशर-पिस्ता, मावा, पिस्ता आणखी बरेच काही. आपण आपल्याला हव्या असलेल्या फ्लेव्हरची निवड करायची. मग ठंडाईची प्रक्रिया सुरू होते.

IMG_20140507_214031 IMG_20140507_214103

ठंडगार दूध, माव्याची पेस्ट, ठंडाईचा अर्क आणि खवा वगैरे वजनदार ऐवज एका ग्लासात घेऊन एकजीव करून घेतला जातो. चमच्यानं छान सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं जातं. त्यात वरून मलई टाकून पुन्हा एकदा ते ढवळलं जातं. नंतर एका ग्लासात त्यावर काजू-पिस्त्याची पेरणी करून आपल्या पुढे ग्लास पेश होतो. काही मंडळी दिवसा किंवा रात्री भांग टाकून ठंडाई घेतात. रात्री भांग टाकून ठंडाई घेणाऱ्यांचं प्रमाण काहीसं अधिक. ठंडाई तयार करतानाच त्यात भांग टाकली जाते. त्यामुळं भांगयुक्त ठंडाई हवी असेल, तर आधीच तसं सांगावं लागतं.

पुरीभाजी आणि जिलेबी…
लखनऊपासून वाराणसीपर्यंत अनेक ठिकाणी फिरताना काही पदार्थ अगदी कायम ठिकठिकाणी दिसायचे. पुडीभाजी, सामोसे आणि कचोडी (कचोरीचा स्थानिक उच्चार) असायचे. त्यापैकी पुरीभाजी आणि जिलेबी हा आपला नेहमीचा नाश्ता. वाराणसी आणि अयोध्येत रामललाच्या दर्शनानंतर झालेला पुडीभाजी आणि जिलेबीचा नाश्ता अजूनही डोळ्यासमोर आणि जिभेवर आहे. सक्काळी सक्काळी पाच-सात पुऱ्या आणि भाजी खाऊन नाश्ता केला, की मग बारा-एक वाजेपर्यंत खाण्यासाठी शोधाशोध करत बसण्याची आवश्यकता भासायची नाही. कांदा-बटाटा रस्सा भाजी आणि सोबत पुऱ्या. बटाट्याची मसालेदार सुकी भाजीही असायची. मात्र, आपली पसंती रस्साभाजीलाच.वाराणसीत काही ठिकाणी पुऱ्यांमध्ये पालकाचं सारण भरलेलं पाहिलं. म्हणजे वरून पुरी साधी वाटत असली, तरी आतमध्ये त्याला पालकाची चव आलेली असायची. ही पुरी साध्या पुरीपेक्षा अधिक टेस्टी वाटायची.

IMG_20140507_100130 IMG_20140504_080859

जिलेबी तर आपला ‘वीक पॉइंट’. गर्रमागर्रम जिलेबी म्हणजे ‘येऊ द्या…’ अनेक ठिकाणी लावलेल्या या जिलेबीच्या स्टॉल्सनी तर आपली भूक जाम खवळायची. जिलेबीचा निघालेला घाणा आपल्या पोटात कसा जाईल, याची चिंता थांबलेल्या ग्राहकांना लागलेली असायची. अर्थातच, त्यात अस्मादिक होतेच. वेळोवेळी पुरीभाजी आणि जिलेबीनं खूप साथ निभावली.

IMG_20140504_075710 IMG_20140504_080637

लस्सी जैसी कोई नही…
उत्तर प्रदेशात फिरताना लस्सीचा मनसोक्त आस्वाद घेतला. अनेकवेळा तर दुपारच्या जेवणाऐवजी लस्सीच व्हायची. थंड, गार आणि दोन ग्लासात पोटभर. शिवाय त्रास होण्याची शक्यता नाहीच. कधी ग्लासात, कधी कुल्लडमध्ये, कधी सॉल्टी तर कधी स्वीट अशी लस्सी शांतीचा अनुभव देतो. लखनऊत भाजपा कार्यालयाशेजारीच राकेश यादव यांचे लस्सीचे दुकान आहे. असेल पंचवीस-तीस वर्षे जुने. राकेश यादव हे रामनरेश यादव यांचे निकटवर्तीय. उत्तर प्रदेशातील कोणताही यादव हा मुलायमसिंह हे आमचे रिश्तेदार आहे, असंच सांगतो. मात्र, राकेश यादव हे त्या यादवांपैकी नाही. रामनरेश यादव यांच्याशी त्यांचे खरोखरच घनिष्ट संबंध आहेत.

IMG_20140502_143612 IMG_20140502_143718

स्वतःच्या गायी-म्हशी आहेत. लस्सी, रबडी, बर्फी, पेढे, मिल्क बर्फी, मलई बर्फी, छेना, कलाकंद आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची विक्री हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. आठ ते नऊ पिढ्या ते हा व्यवसाय करीत आहेत. दुग्धजन्य पदार्थांची विक्री एवढ्यापुरतेच राकेश यादव मर्यादित नाहीत. त्यांनी त्या विषयाचं थोडंफार वाचनही केलंय. काही दाखले ते देतात. लस्सीला वैदिक काळात ‘मधुपारक’ म्हणायचे. आता त्याला लस्सी हा पंजाबी शब्द रूढ झालाय. इ.इ. लस्सीवरून मग वैदिक काळात सोमरस कसा तयार व्हायचा, सोम नावाच्या झाडापासून तयार केलेल्या रसाचे गुणधर्म सकाळी अमृतासारखे, दुपारी औषधासारखे नि रात्री ‘सोमरसा’ सारखे असतात अशी अनेक प्रकारची माहिती दे लस्सी पिताना तुम्हाला देत असतात. किती घ्यायची आणि किती सोडून द्यायची, हे तुम्ही ठरवा, असंही वर सांगतात.

IMG_20140429_135016

बेलफळाचा ज्यूस…
बेलफळाच्या ज्यूसने खूपच आधार दिला. आता हे बेलफळ म्हणजे आपल्याकडे बेलाच्या झाडाला जे फळ येतं तेच बेलफळ की वेगळ्या जातीचे बेलफळ हे मला माहिती नाही. मात्र, तिथं मी जे प्यायलं त्याला बेलफळाचा ज्यूस असंच म्हटलं जायचं. हा ज्यूस थंड आणि पाचक असतो. अवघ्या दहा रुपयांत ग्लासभर ज्यूस. साखर घातल्यामुळं चवीला गोडसर लागणारा हा ज्यूस आमरसच्या रंगाचा आणि तितकाच घट्ट. खूप पातळही नाही नि खूप घट्टही नाही. बेलफळाच्या ज्यूसच्या गाड्या लखनऊ, रायबरेली, अमेठी, सुल्तानपूर, बाराबंकी वगैरे ठिकाणी मुबलक प्रमाणात दिसतात. चौकाचौकांत या गाड्या असतात. वाराणसी वगैरे परिसरांत मात्र, या गाड्या फारशा दिसत नाही.

अमेठीतील टोमॅटो चाट…
अमेठी गाव आणि अमेठी मतदारसंघात फिरताना विकासाचे नामोनिशाण दिसले नाही. त्याबाबत तेव्हाच एक सविस्तर ब्लॉग लिहिला होता. मात्र, अमेठीत फिरताना एक अनोखा स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची संधी मिळाली. एका हातगाडीवर. टोमॅटो चाट… स्थानिक नाव. टोमॅटोवरून कापायचा आणि त्यामधील बिया आणि सगळा गर काढून टाकायचा. मग त्यामध्ये मीठ-मिरची-मसाला वापरून तयार केलेलं बटाट्याचं सारण भरायचं. हा टोमॅटो बेसनामध्ये घोळवून मस्त तळून घ्यायचा. मग हा ‘टोमॅटो वडा’ कापून त्यावर चाट मसाला टाकून खायचा किंवा हा वडा चाटसोबत खायचा. मी ‘टोमॅटो वडा’ चाटची ऑर्डर दिली.

IMG_20140501_171654 IMG_20140501_171745

मग त्या गाडीवाल्यानं तवा गरम करायला लावला. त्यावर थोडं तेल टाकून त्यामध्ये एक टोमॅटो वडा टाकला. तो वडा तिथं मोडला आणि तेलामध्ये मस्त कुस्करला. त्यावर वाटाण्याचा रगडा टाकला. चिंचगुळाचं पाणी टाकलं आणि ते मस्त गरम होईपर्यंत परतलं. त्यावर चाट आणि कुठले मसाले टाकून ते एका वाटीमध्ये खायला दिलं. सोबत आइस्क्रिम खातो, तसा चमचा. एकदा बढिया… जबरदस्त.

IMG_20140505_183007

टेस्टी फ्राय पोटॅटो…
वाराणसीमध्ये काशी विश्वनाथाच्या मंदिराकडे जाताना गोदोलियाच्या अलिकडे संध्याकाळी एक गाडी लागते. त्यावर बटाटे वडा, पाव पॅटिस आणि मिरची भजीच्या जोडीला तळलेले बटाटे मिळतात. पहिल्या तीनही पदार्थांपेक्षा तळलेले बटाटे पसंतीस अधिक उतरणारे. भाजीसाठी कापतो तसे बटाटे कापून घ्यायचे. साली काढायच्या. कापलेले बटाटे बेसनाच्या पातळ पिठात हलकेच बुडवून उकळत्या तेलात सोडायचे. बटाट्यांवर बेसनाचा हलकाच थर बसेल इतकं पीठ पातळ हवं. खमंग तळून घ्यायचे म्हणजे आतला बटाटा शिजतो आणि वरचं बेसनही खरपूस होतं. मग त्या तळलेल्या बटाट्यांवर चाट मसाला टाकून ते प्लेटमध्ये द्यायचे. कुठंही मिळणाऱ्या फिंगर चिप्सपेक्षा अव्वल आणि संस्मरणीय…

सरतेशेवटी बनारस पान…
बनारसला जाऊन बनारसी पान न खाणाऱ्याला काय म्हणावं… तेव्हा बनारस पान न खाऊन कसं चालणार. बनारसी पान म्हणजे एकदम साधं. चुना, कात, चटणी, खुशबू, तुम्हाला हवा तेवढा किवाम आणि सुपारीची भिजवलेली खांडं… भरमसाठ पदार्थ न घालता फक्त मोजकेच पदार्थ टाकून बनारस पान तयार होतं. शिवाय विशिष्ट पद्धतीनं स्टाइलमध्ये शंकुच्या आकारातलं पान खाण्यासाठी दिलं जातं.

IMG_20140507_215015 IMG_20140507_215047

पानाच्या ठेल्यावर एक गोष्ट कॉमन दिसते. स्वच्छ कापडाच्या घड्या करून ती घडी भिजवून ठेवलेली असते. पाण्यात ठेवलेली पानं त्या ओल्या कापडावर घासून पुसून मग पान लावायला सुरुवात केली जाते. चुकून एकदा नेमकं ते काय आहे, हे पाहण्यासाठी त्याला हात लागला. तेव्हा तो पानवाला म्हणाला, ‘भैय्याजी वै झूठा हो जायेगा… (हात लावल्यावर कसं काय झूठा (म्हणजे उष्टं) होणार?’ माझी साधी सोपी शंका. त्यावर तो पानवाला म्हणाला, ‘भैय्याजी, उसको पान के अलावा कोई भी चीज छुए तो वो झूठा हो गया, ऐसे ही हम समझते है…’ बापरे पानाला इतकं पवित्र नि शुद्ध ठेवल्यामुळेच कदाचित देशभरात ‘बनारसी पान’ लोकप्रिय झालं की काय, असा विचार माझ्या मनात अगदी सहजपणे आला.

IMG_20140506_101814 IMG_20140506_101838

वाराणसीमध्ये ‘सरकारी भांग की दुकान’ अशी एक पाटी कायम येता-जाता दिसायची. दुकानाजवळून जाता-येता नुसत्या वासानं डोकं उठायचं. जास्त वेळ थांबलं तर नुसत्या वासानं झिंग येईल, असं वाटायचं. तिथं एकदा चौकशी केली असता बारा रुपयाला भांगेची एक मोठी गोळी मिळते, असं समजलं. भांगेची ती गोळी दुधातून, ठंडाईतून, लस्सीतून वगैरे घेतली जायची. भांगेचे सर्व परिणाम माहिती असल्यामुळं भांगेचा आस्वाद घेण्याची इच्छा काही पूर्ण केली नाही. ज्यांना भांग खाण्याची इच्छा पूर्ण करायची असेल, त्यांना काशी विश्वनाथाच्या वाराणसीचे हार्दिक निमंत्रण आहे…

उत्तर प्रदेशात फिरताना खूप काही पाहिलं. पण खूप काही पहायचं राहूनही गेलं. खूप काही खाल्लं, पण खूप काही खायचं राहूनही गेलं. आपल्याकडे मिळणाऱ्या कैरीच्या पन्हाच्या धर्तीवर मिळणारं ‘आम पन्ना’, फक्त पुदीन्याच्या पाण्यावर तयार होणारी पाणीपुरी, कढईमध्ये गर्रमागर्रम कुरमुऱ्यांपासून तयार होणारी सुकी भेळ, कचोडी, सामोसे, बालुशाही, लिंबू सरबत, लिंबू शिकंजी आणि बरचं काही खाल्लं. पण चिकन आणि मटणाचे लखनवी प्रकार, लखनवी बिर्याणी, बिहारी मंडळींचा लिट्टी-चोखा असे अनेक पदार्थ खायचे राहून गेले. बघू परत कधी संधी मिळतीये. वेगवेगळे पदार्थ मनसोक्त खायचीआणि भरपूर लिहायची.

पुन्हा भेटूच… पुढच्या खाद्यसफरीदरम्यान…

उत्तर प्रदेशातील इतर ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

मोदी आनेवाला है…

मुक्काम पोस्ट अमेठी…

रामलला हम आएंगे…

मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या इंद्रेशजींसमवेत एक दिवस

धर्मापलिकडची ‘चाह’

उत्तर प्रदेश… उत्तम प्रदेश…

स्वोर्डफिश, बीफकरी आणि प्रसादम्

केरळची सफर सुफळ संपूर्ण…

केरळमध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. केरळंच असं नाही, कुठंही गेल्यानंतर म्हणू आपण. ‘शोधलं की सापडतं’ या धर्तीवर नवनवीन पदार्थांची ओळख होत जाते. काही वेळा पदार्थ स्वतःहून चालून येतात, कधीकधी आपल्या त्यांच्या शोधार्थ हिंडावे लागते. पण इच्छा तिथं पदार्थ हे निश्चित.

पुण्याहून मिरजमार्गे बेळगाव आणि मडगाव मागे टाकत केरळच्या दिशेने निघालो. गोवा आणि कर्नाटक मागे सोडल्यानंतर कासरगौड हे केरळचं पहिलं स्टेशन लागलं. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा नि पुन्हा कर्नाटक अशी राज्य मागे टाकत असताना केरळमध्ये आल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो. एकदम स्वच्छ आणि नीटनेटक्या स्टेशनचा आपल्याला अनुभव आपल्याला येतो. चहा, कॉफी आणि थोडं तरी काही खायला मिळेल असे अनेक स्टॉल्स. खाण्यापिण्याचं वैविध्य स्टेशनवरही अगदी जाणवणारं. गोवा आणि कर्नाटकात सात आणि दहा रुपयाला मिळणारा चहा केरळमध्ये गेल्यानंतर अवघ्या पाच रुपयांमध्ये. तो देखील एकदम कडक आणि झकास.

पुणे-एर्णाकुलम एक्स्प्रेसनं पहाटे साडेचार वाजता एर्णाकुलमला पोहोचलो. चहा-कॉफीच्या माऱ्यामुळं आम्हाला खूपच वैताग आला होता. तेव्हा स्टेशनवरून बाहेर आलो आणि रिक्षा-बसच्या शोधार्थ इकडे तिकडे भटकत असताना एक छोटी टपरी दिसली. इतर ठिकाणांपेक्षा तिथं गर्दी अधिक होती. चांगल्या दर्जाचं खाणं मिळत असल्याचे गर्दी हा एक उत्तम निकष आहे. साहजिकच आमची पावलं त्या दिशेनं वळली.

WP_20150209_04_38_54_Pro WP_20150209_04_38_36_Pro

पत्रीपुरी आणि भाजी
एक छोटीसी टपरी. टपरीचं नाव काहीही नाही. विचारलं तर कोणीच काही बोलायला तयार नाही. शेवटी त्या टपरीचं नाव महंमद स्टोअर्स असं होतं. आता तिथली लोकं नाव का सांगत नव्हते ते महंमदासच ठाऊक? असो. टपरीवर समोरच एका बंबामध्ये चहा उकळत होता. तो चहा ग्राहकांना देण्याचं काम मुलगा करीत होता. त्याच्या मागच्या बाजूला लुंगी नेसलेला एक माणूस पुऱ्यांचा घाणा काढत होता. आधी त्यानं पत्रीपुरी, नंतर मेदूवड्या सदृश वडे आणि नंतर चना-भटुरामध्ये असतात, तशा मोठ्या गुब्बू गुब्बू पुऱ्यांचा घाणा काढला. यापैकी पहिले दोन्ही पदार्थ तसे अनोळखीच होते. सुरुवातीला पत्रीपुरी आणि पातळ भाजी मागविली. तांदळाच्या पिठाची जाडसर पुरी. आता त्यात फक्त तांदळाचं पीठ होतं की उडदाच्या डाळीचं पीठही होतं माहिती नाही. पण पिठाची जाडसर पुरी. भोपळ्याचे घारगे किती जाड असतात तितकीच जाड. बटाट्याची पातळ डोसा भाजी. चवीला एकदम टेस्टी. भाजी न घेता देखील पत्रीपुरी उत्तम चवीची.

एक पुरी आणि भाजी संपेपर्यंत मेदूवड्या सदृश वड्यांचा घाणा निघाला होता. त्याचं नाव त्या महंमदासच ठाऊक. पण कोणतीही चटणी किंवा सांबार बरोबर न घेताही हा वडा अगदी छान लागत होता. पिठातच मिरची, आलं, जिरे, खोबरं वगैरे पदार्थ मिसळले असावे. त्यामुळं नुसता वडाही अप्रतिम लागत होता. वडा संपविल्यानंतर मग पुरी आणि भाजी घेण्याच्या फंदात आम्ही पडलो नाही. ‘ब्लॅक लेमन टी’ने आम्ही आमच्या साडेचार-पाच वाजताच्या छोटे‘खानी’ खाद्ययात्रेची सांगता केली.

IMG_20150209_122350  IMG_20150209_122524

फोर्ट कोच्चीत ‘स्वोर्ड फिश’
फोर्ट कोच्चीचा फेरफटका मारताना ‘चायनिज फिशिंग नेट’मध्ये पकडेलेले मासे शेजारीच किनाऱ्यावर विकण्यासाठी ठेवलेले असतात. ते मासे पाहणं हा एक छान उद्योग असतो. मासे पकडतात, मग जाळ्यातले मासे बॉक्समध्ये आणले जातात, ताजे फडफडणारे मासे, निरनिराळ्या स्टॉलवर निपचित पडलेले मासे, किमान पंधरा ते वीस प्रकारचे मासे असा सगळा माहोल डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो. तिथूनच मासे विकत घेऊन घरगुती मसाले वगैरे वापरून फिशकरी किंवा फिशफ्राय मिळण्याची व्यवस्थाही तिथं उपलब्ध असते. अर्थात, किमान एक किलो मासे घ्यावे लागतात. आम्हा दोघांमध्ये एक किलो मासे संपतील, याची खात्री नसल्यानं आम्ही त्या मार्गानं गेलो नाही. पण जरूर ट्राय करण्यासारखा ऑप्शन वाटला.

IMG_20150209_123308 IMG_20150209_123317

इकडेतिकडे फोटोसेशन केलं. कैरी, अननस आणि आवळा वगैरे पदार्थांचे तिखट-मीठ लावलेले काप खाल्ले. भारतात येण्यासाठी नव्या मार्गाचा शोध लावणारा दर्यावर्दी वास्को-द-गामाला ज्या ठिकाणी पुरण्यात आले होते, त्या ठिकाणाचं दर्शन घेतलं. पंधराव्या शतकातील सेंट फ्रान्सिस चर्च येथे त्याला प्रथम पुरण्यात आले होते. नंतर त्याचा मृतदेह मुलाने पोर्तुगालला नेला. मात्र, सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये ती जागा अजूनही तशीच राखीव ठेवण्यात आली आहे.

आपल्या पर्यटन स्थळांचं एक वैशिष्ट्यं आहे. गोऱ्या चमडीचे परदेशी पर्यटक असले, की विक्रेते अमेरिकी डॉलर्स किंवा पौंडमध्ये वस्तूंच्या आणि पदार्थांच्या किमती ठेवतात. त्यामुळं पदार्थ्यांच्या किमती अनाठायी वधारतात. वस्तूंच्या किमतींचं तेवढं देणंघेणं नव्हतं. पण खायचं म्हटल्यावर शंभर रुपयांना मिळणाऱ्या पदार्थांवर पाचशे नि सहाशे रुपये कशाला खर्च करा. त्यामुळं स्वस्त नि मस्त जेवण कुठं मिळणार, या शोधात फोर्ट कोच्चीतील अनेक रस्ते पायदळी तुडविले. अखेरीस पुन्हा एक गाडीच आमच्या मदतीला धावून आली.

एकदम साधी हातगाडी. स्थानिक लोकांसह काही परदेशी पर्यकही तिथंच जेवणावर ताव मारत होते. आम्हीही मग त्यांनाच जॉईन झालो. एकदम साधं पण घरगुती स्वरुपाचं जेवण. फ्राय ‘स्वोर्डफिश’, आमसूल घातलेली आंबट फिशकरी, तूरडाळीची भाजी, कांदा, लोणचं, पापड नि उकड्या तांदळाचा भात. अनलिमिटेड फिशकरी आणि भात. बाकीच्याचे पैसे जादा. सरतेशेवटी मिरच्या चिरून तयार केलेलं अतीआंबट ताक. हवा असल्यास मलबारी परोटा. पण त्याला मागणी फारशी नाही.

IMG_20150209_141316 swordfish_fb

‘स्वोर्डफिश’ची चव काहीशी बांगड्याजवळ जाणारी. तसं पहायला गेलं तर स्वतःची स्वतंत्र चव किंवा ओळख नाही. आतला काटा प्रचंड मोठा आणि जाडा. शिवाय माशाची स्कीन देखील खूपच जाड. आतमध्ये मात्र, मासा एकदम मऊ. स्वतःची चव जाणवत नसली तरीही मसाल्यांमुळे माशाची रंगत वाढणारी. उकड्या तांदळाचा भात, आंबट कालवण आणि फिशचा तुकडा. व्वा… व्वा… पंचतारांकित हॉटेलांच्या तोंडात मारेल अशी चव. भरपूर भात आणि फिशकरी खाऊन तृप्त झालो आणि मग फोर्ट कोच्चीमधील सिनेगॉग, बाजार, कोचीनच्या राजाचा लाकडी महाल, संग्रहालय वगैरे गोष्टी पाहिल्या. त्यापैकी सिनेगॉग आणि लाकडी महाल आवर्जून पाहण्याजोगा.

लाकडी महालात वाचलेली एक कहाणी अशी… केरळमधील चोर राजाने चंद्र पडताना पाहिला. मग त्याने मक्केला जाऊन मुस्लिम धर्म स्वीकारला आणि अनुयायांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याची तसेच अखेरपर्यंत त्याचा प्रचार-प्रसार करण्याची आज्ञा केली. (आता यांची घरवापसी कशी करणार यार?)

IMG_20150211_165614 IMG_20150211_165657 IMG_20150211_165712 IMG_1876-575x262

बीफकरी आणि परोटा
‘घरवापसी’वरून आठवलं केरळमध्ये बीफकरी आणि परोट्टाचा आस्वाद अस्मादिकांनी घेतला. मित्रवर्य देविदास देशपांडे यांच्या अतीव आग्रहाखातर. महाराष्ट्रात गोहत्यबंदी आणि बीफ बाळगणे किंवा खाणे वगैरे आता अपराध आहेत. अर्थात, तिथं खाऊन इथं येणं हा गुन्हा नाही. असो. प्रत्येक राज्यानुसार तिथली संस्कृती आणि कायदे बदलतात. पण बडेका, दस नंबरी किंवा बीफ म्हणजे नेमकं असतं तरी काय, केरळंमध्ये ते इतकं का लोकप्रिय वगैरे प्रश्न होते, त्यासाठी मी आणि देवीच्या दासानं बीफची ऑर्डर केली.

एकदम हलका, पापुद्रेवाला मलबारी परोटा आणि सोबत बीफकरी. थेवरा जंक्शनहून ‘मामळी मुक्कू’ला जाताना एका छोटेखानी फूड जॉइंटवर नवा प्रयोग घडत होता. (काही जण त्याला मामाजी मुक्कूही म्हणतात. नाव आणि उच्चारांच्या गडबडीत भलत्याच गाडीत चढून दुसऱ्याच गावाला पोहोचण्याचा अनावश्यक प्रवास होता होता वाचला होता. तेच हे ‘मामळी मुक्कू’) गाय, बैल आणि म्हैस असे विविध प्राणी बीफ या अंतर्गत मोडतात. आम्ही जिथं गेलो होतो, त्यानं ते मांस बैलाचं आहे, असं सांगितलं. खरं खोटं त्यालाच ठाऊक. ‘पचेल ते आणि रुचेल ते खा’ किंवा ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे,’ असं सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आठवले आणि बीफ करीची ऑर्डर दिली.

बीफ शिजणं ही एक कठीण गोष्ट असते. अनेक तास ते शिजवावं लागतं. बकरी किंवा मेंढीचं मटण नीट शिजवून तयार करणं ही खूप अवघड गोष्ट असते. त्यामुळंच खूप कमी जणींना किंवा खूप कमी ठिकाणी उत्तम शिजलेलं मटण मिळतं. मटणाचे हे हाल तर मग बीफचं काय. तसाच काहीसा प्रत्यय आम्हालाही आला. चार-पाच पीसमागे एखादा पीस हा कमी शिजलेला किंवा थोडासा निबर असा. बाकीचे पिसेस उत्तम शिजलेले. बीफची करी मात्र, उत्तम. चवीला आंबटच पण स्वादिष्ट. मलबारी परोटा करीमध्ये कुस्करून खाण्यात भलतीच गंमत. थोडंसंच खाल्ल्यामुळं बीफ पचलंही आणि काहीसं रुचलंही. तेव्हा नेक्स्ट टाइम देखील थोडाफार आस्वाद घ्यायला हरकत नाही.

कोच्चीहून तिरुवनंतपुरमला गेल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि प्रेस क्लब येथेच नाश्ता तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तरीही आम्ही वेगळा आस्वाद घेण्याच्या निमित्तानं ‘मदर्स व्हेज प्लाझा’ गाठलं होतं. तसंच एकेदिवशी सकाळी ऋषिमंगलम परिसरातील एका छोट्याशा हॉटेलवजा टपरीवर गेलो. एका मुस्लिम माणसाची ती टपरी होती. कॅशिअर म्हणून बसलेल्या त्याच्या बायकोच्या पेहरावावरून ते समजलं. तिथं आम्ही हरभऱ्याची उसळ आणि अप्पम नि मलबारी परोट्टा असा नाश्ता मागविला. इडली, डोसा, उत्तप्पा, पुट्टू, पुरी-भाजी वगैरे नाश्ता नेहमीच होत होता. त्यामुळं उसळ आणि अप्पम मागविलं.

IMG_20150213_093601 IMG_20150213_094812

हरभऱ्याची उसळ नि अप्पम…

फोडणीला लाल मिरच्यांचा तडका मारलेली हरभऱ्याची झणझणीत तर्रीदार उसळ आणि सोबत अप्पम. एक एकदम झणझणीत तर दुसरा स्वतःमध्ये त्याचा झणझणीतपणा सामावून घेणारा. त्यामुळं हे कॉम्बिनेशन खूपच चांगलं जमून आलं होतं. मलबारी परोट्टाची पण तीच गत. ग्रेव्हीमध्ये परोट्टा कुस्करून खाणं भलतंच भारी लागत होतं. साध्या हरभऱ्याच्या उसळीनंही नाश्त्यामध्ये जोरदार रंगत आणली होती. त्यानंतर पळमपुरी मागविली. म्हणजे पिकलेल्या केळ्याची भज्जी. पण ‘पळमपुरी‘ या दौऱ्यात प्रथमच खाल्ली. पिकलेल्या केळ्यावर मैद्याचं पीठ लावून तळलेली ही ‘पळमपुरी’ बहुतेकांना आवडणार नाही बहुधा. शेवटी ब्लॅक टी. नेहमीच्या चहापेक्षा कमी उकळलेला म्हणजेच फिका. पण दूध न घालता प्यायचा असल्यानं असा फिका चहाच उत्तम लागतो. अन्यथा तो उगाच कडवट लागतो.

कच्च्या केळ्याच्या भजीला, बनाना भजी असं म्हणतात. ती ‘पळमपुरी’पेक्षा वेगळी. ती करताना पिठातच तिखट-मीठ घालून मग भजी तळतात. बनाना भजी, आलू वडा, सामोसा, मिरची भज्जी, दालवडा असे पदार्थ मिळतील तसे खाणं सुरूच असायचं. हे सगळं दुपारच्या वेळचं खाणं. सकाळी इडली, वेळीअप्पम, डोसा, उत्तप्पा, इडिअप्पम, पुट्टं वगैरे वगैरे. सकाळी-दुपारी कधीही खाता येईल असा आणखी एक पदार्थ आम्ही खाल्ला. त्याचं नाव माहिती नाही. पण तांदळाच्या पारीमध्ये गूळखोबऱ्याचं सारण घालून ती पारी करंजीसारखी बंद करायची. ती चपटी करंजी केळीच्या पानात घालून उकडायची आणि खायची. हा पदार्थ स्वीटडिश म्हणून एकदम अफलातून. देविदास देशपांडे याने सांगितल्यानुसार त्याला वल्सन असे म्हणतात… हो वल्सनच…

IMG_20150213_095111 IMG_1291

श्री पद्मनाभ मंदिरातील प्रसादम्…
केरळ दौऱ्यातील खाद्यभ्रमंतीची सांगता श्री पद्मनाम मंदिरातील प्रसादाने करणे इष्ट. मंदिरात गेलो, दर्शन वगैरे झालं आणि गर्दी कमी होती म्हणून प्रसाद घ्यावा म्हटलं. रांगेत थांबलो. गुलाबी कम चॉकलेटी रंगाचा उकड्या तांदळाचा भात, त्यावर आमटी, सोबतीला बटाट्याची की कसलीशी भाजी, आंब्याचं लोणचं आणि पापड. कुठल्याही देवस्थानात मिळतो तशाच स्वरुपाचा प्रसाद. चवीलाही उत्तम. अर्थात, कितीही आवडला तरी परत घेण्याची बहुधा सोय नाही. गंमत प्रसादात नाही. नंतरच आहे.

प्रसादाचं जेवण संपल्यानंतर इतर ठिकाणी ताट स्वच्छ करण्यासाठी ठेवून द्यायचं आणि हात धुवायला पुढं जायचं, असा क्रम असतो बहुधा. इथं मात्र, आपलं ताट आपल्यालाच धुवायचं असतं. बरं, देवाच्या दारी आपलं ताट धुवायलाही हरकत नाही हो. पण ताट धुतल्यानंतर जिथं ते ठेवायचं असतं, त्याठिकाणी देवस्थानची एक व्यक्ती बसलेली असते. ती व्यक्ती ताट स्वच्छ आणि नीट धुतलेलं आहे की नाही, याची खातरजमा करते आणि मगच ताट ठेवून घेते. नीट धुतलं नसेल तर परत पाठवून ते पुन्हा स्वच्छ धुवून आणा, असा आदेशच देते. आमच्यासमोरच दोन-तीन जणांना ताट नीट धुण्यासाठी परत पाठवलं आणि आम्ही हसून हसून लोळलो. देव कठीण परीक्षा घेतोच, पण देवाचे बडवेही कठीण परीक्षेला सामोरे जायला लावतात, असा अनुभव पद्मनाभ मंदिरात अनेकांना येतो.

केरळच्या खाद्यसंस्कृतीचे अजीर्ण होण्यापेक्षा तूर्त तरी इतकेच पुरे. पुदुच्चेरी, उत्तर प्रदेश, गोवा आणि इतर ठिकाणची खाद्यभ्रमंती हळूहळू ब्लॉगवर येतच राहिलं. तेव्हा स्वादिष्ट खा, स्वादिष्ट बोला आणि स्वादिष्ट वाचा…
धन्यवाद.

(ता. क. – केरळमधील एका गावाचे काट्टकुट्ट असे आहे. मराठीतील खाटखूट हा शब्द त्यावरून आला आहे किंवा कसे, याबाबत संशोधनास पुरेपूर वाव आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी…)

केरळचे जुने ब्लॉग्ज…

कप्प ते पुट्ट व्हाया अप्प… 

देवभूमीतील स्वादिष्ट ‘सद्या’

मदर्स व्हेज प्लाझा… खाद्यप्रेमींचे दैवत…

दक्षिण भारत ही भ्रमंतीसाठी आणि खादाडीसाठी कायमच माझ्यासाठी पर्वणी आहे. त्यातून देवभूमी केरळ असेल तर मग विचारायलाच नको. केरळ ही देवभूमी आहेच. पण त्याचबरोबर केरळ ही चवभूमी देखील आहे. पर्यटकांना मुन्नार नि थेक्कडीच्या पर्वतरांगांचं आकर्षण असतं. अलेप्पी नि कुमारकमच्या बॅकवॉटरबाबत उत्सुकता असते. कुणाला गुरूवायूरच्या मंदिरास श्रीकृष्णाचं आणि तिरुवनंतपुरमच्या पद्मनाभस्वामी मंदिरात श्रीविष्णूचं दर्शन घेण्याची ओढ लागलेली असते. तर कुणी ‘स्वामी शरणम् अय्यप्पा’ असं म्हणत पठनमतिठ्ठा गाठण्यासाठी धडपडत असतो. कलाप्रेमींना कदाचित तिथल्या कथकली किंवा कलरीपायट्टू विषयी ओढ असते.

IMG_20131117_100245

मला मात्र, केरळचं ‘चवभूमी’ हे स्वरूप अधिक आवडतं. काय नाहीये इथं. दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती इडली आणि डोसा यापुरतीच मर्यादित नाही, याचं विस्तृत दर्शन आपल्याला केरळमध्ये घडतं. इडली, डोसा आणि उत्तप्पा तर आहेच. पण अप्पमचे तीन-चार प्रकार, पुट्ट विथ चिकन करी, मलबारी परोटा विथ बिफ करी, केळ्याच्या भजी, केळ्याचे वेफर्स, साबुदाण्याच्या कंदाचे (कप्प) विविध प्रकार आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे अस्सल ऑथेंटिक केरळी सद्या. प्रत्येक पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा झाला, तर अनेक दिवसांचे नियोजन करून मगच केरळात जायला हवं, अशी परिस्थिती.

पहिल्यांदा केरळभूमीत जाऊन साधारण सव्वा वर्षच उलटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा केरळला जाण्याची बळावली आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं निमित्त साधून केरळला पोहोचलो. खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायचा, इकडं तिकडं मनसोक्त फिरायचं आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील चुरस नि अॅथलेटिक्समधील थरार अनुभवायचा… या हेतून देवभूमी गाठली.

यंदाच्या केरळ भ्रमंतीत लक्षात राहिलेला खाद्यानुभव म्हणजे केरळची राजधानी तिरुवनंतपुरममधील ‘मदर्स व्हेज प्लाझा’. ओणमच्या काळात मिळणारं किंवा केरळचं पारंपरिक जेवण म्हणून ओळखलं जाणारं ‘सद्या’ जिथं मिळतं ती ऑथेंटिक खाणावळ. तिरुवनंतपुरममधील बेकरी जंक्शनजवळ ‘मदर्स व्हेज प्लाझा’ आहे. केरळ ही जर देवभूमी असेल, तर ‘मदर्स व्हेज प्लाझा’ हे स्वर्गसुख आहे. आई शप्पथ सांगतो, तिरुवनंतपुरमला जाऊन तुम्ही तिथं जेवला नाहीत, तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच. शंभर रुपये, १६० रुपये आणि ओणम स्पेशल २१० रुपये अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये जेवण विभागलेलं आहे. किमतीनुसार मिळणाऱ्या पदार्थांची संख्या कमीअधिक.

IMG_20150212_132229

८०-१०० पान सहज उठेल इतका प्रशस्त हॉल. चकचकीत खुर्च्या-टेबलं मांडलेली. पैसे देऊन कुपन्स घेतल्यानंतर टेबलावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. आम्ही १६० रुपयांचं कुपन घेतलं आणि विराजमान झालो. आम्ही गेलो तेव्हा तिथं लोकं येण्यास जस्ट सुरुवात झाली होती. म्हणजे फक्त दोन-तीन टेबलंच व्यापलेली होती. आम्ही एक टेबल व्यापलं. केळीचं पान आमच्यासमोर ठेवण्यात आलं. पान साफ करण्यासाठी पेपर नॅपकीन देण्यात आला. केळीचं पान स्वच्छ केल्यानंतर एकेक पदार्थ येऊन स्थानापन्न व्हायला लागले. पहिला मान केळीचे दोन-तीन वेफर्स (वट्टल), उप्पेरी आणि छोटेखानी परिप्पू वडा यांचा. उप्पेरी म्हणजे गुळाच्या पाकात कच्च्या केळीचे काप बुडवून तयार केलेला पदार्थ. तर परिप्पू वडा म्हणजे आपला नेहमीचाच डाळ वडा. वाढपी देखील आग्रहानं वाढत होते. तोडक्या मोडक्या मल्याळी आणि इंग्रजीतून संवादांची देवाणघेवाण सुरू होती. आम्ही मल्याळी नाही, म्हटल्यानंतर आमच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत होतं.

केरळी जेवणातील ‘फरसाण’चे प्रकार आटोपल्यानंतर मग चार लोणच्यांची एन्ट्री होते. इंजि म्हणजे आलं, नारंगा म्हणजे लिंबू, मंगा म्हणजे आंबा आणि नेल्लिक्का म्हणजे आवळा. चारही प्रकारची लोणची वेगळ्या चवीची आणि वेगळ्या रंगांची. इतर लोणची आपल्याकडेही मिळतात. इंजिकरी किंवा आल्याचं लोणचं हे खास केरळी धाटणीचं. आवळ्याचं लोणचंही मस्त लागतं. चार लोणच्यांनंतर चार प्रकारच्या किचडी म्हणजे कोशिंबिरी आपली भूक आणखी चाळवितात. लाल भोपळा आणि काकडीची कोशिंबीर सर्वत्र मिळते तशाच प्रकारची. मात्र, अननसाची कोशिंबीर एकदम स्वादिष्ट आणि वेगळी चव जिभेवर रेंगाळत ठेवणारी. पण त्यापेक्षाही हटके वाटते, ती कारल्याची दह्यातील कोशिंबीर. कडू कारलं, गोड दही आणि निरनिराळे किरकोळ मसाले वापरून केलेली कारल्याची किचडी एकदमच लाजवाब. पुन्हा पुन्हा मागविली जाणारी. अगदी तुम्हाला कारलं आवडत नसेल तरीही प्रेमात पडाल, अशी किचडी.

IMG_20150212_124939

किचडीनंतर येतात त्थोरन, अवियल आणि भेंडीची सुकी भाजी. अवियल म्हणजे मिक्स भाजी पण सुकी. तर त्थोरन म्हणजे गाजर, बीट, कोबी, कारलं, मटार किंवा वाटाणे आणि आणखी काही भाज्या एकत्र करून तयार केलेली मिक्स रस्सा भाजी. खोबऱ्याचं वापर सढळ हाताने केलेला हे सांगायला नकोच. अवियल आणि त्थोरनच्या जोडीला होती भेंडीची भरपूर खोबरं घालून तयार केलेली सुकी भाजी. भेंडीची भाजी पण काय लागत होती यार… व्वा…

एव्हाना पापडम (उडदाचा पापड) आणि पळम म्हणजे केळं हे देखील पानात वाढण्यात आलं होतं. हा सगळा लावाजामा आल्यानंतर प्रमुख कलाकाराचे आगमन होते. चित्रपटात कसं नामावली दाखविताना आणि अमिताभ बच्चन किंवा आणि काशिनाथ घाणेकर वगैरे नावं येतात. तसं आणि भात… अशी पाटी पडते नि पानात भात वाढला जातो. मल्याळममध्ये भात म्हणजे चोरू. बोली भाषेत चोर चोर असं म्हणतात बहुधा. केरळमध्ये भात दोन प्रकारचा असतो. एक साध्या तांदळाचा आणि दुसरा उकड्या तांदळाचा. उकड्या तांदळाच्या भाताची शितं भलतीच टप्पोरी असतात. तो भात अधिक काळापर्यंत भूक भागविणारा असतो. मात्र, आम्ही गेलो तेव्हा इतरत्र मिळतो तशाच प्रकारचा भात पानात वाढण्यात आला.

जेवायचं कसं याचे सुद्धा इथं काही रितीरिवाज आहेत. ते आम्हाला सांगण्यात आले. म्हणजे पहिला भात डाळीसोबत घ्यायचा. दुसरा भात सांबारबरोबर घ्यायचा. तिसरा भात पुलशेरी म्हणजे कढीसदृश पातळ कालवणासोबत घ्यायचा. डाळ म्हणजे आमटी किंवा वरण नाही. डाळ अगदी बारीक वाटून त्यात खोबरं आणि आलं टाकून झक्कास फोडणी दिलेली. डाळीबरोबर भात असा काही जमून गेला, की जणू लक्ष्मीनारायणाचा जोडाच. डाळभातमध्येच पैसा वसूल समाधान मिळालं. डाळभात संपल्यानंतर मग भातामध्ये सांबार पेरणी झाली. दाट घट्ट सांबार आणि त्यात दुधीभोपळ्याचे मोठेमोठे काप. एखाददुसरा शेवग्याच्या शेंगेचा तुकडा. सांबार भात तर हुकुमी एक्का. त्याबद्दल काय बोलणार. दाक्षिणात्य जेवणाचा सामना एकहाती ओढून नेण्याची ताकद सांबार भातात आहे. सांबार भात संपतो ना संपतो तोत पुन्हा भात आला. आणि त्यावर पुलशेरी वाढली. डाळ आणि सांबारनंतर भाताबरोबर आणखी एक चव जिभेवर रेंगाळू लागली.

IMG_20150212_124959

ही चव फार वेळ आमच्या तोंडावर रेंगाळणार नाही, याची काळजी वाढपी लोक घेत होते. भाताचा स्पेल काही काळासाठी थांबला. मग आली बोली. साखरेच्या पुरणापासून तयार केलेली गोड पोळी. अर्थात, पुरण हलक्या हातानंच वापरलेलं. बोलीवर वाढलं पायसम. पुरणाच्या पोळीवर शेवयाची खीर. थोडीशी जास्तच गोड. पुरणाच्या पोळीचा घास घेताना केळीच्या पानावर पटापट पसरणारं पायसम तिथंच रोखून धरणं महाकठीण काम. त्यासाठी खाण्याचा वेग थोडा वाढवावाच लागतो. तरच बोली आणि पायसम यांचं समीकरण जुळून येतं. बोली-पायसम संपण्याच्या आधीच अडा पायसम जागा अडवितं. अडा पायसम म्हणजे गूळ वापरून खीर करतात आणि त्यात तांदळाच्या पिठापासून तयार केलेले काप सोडतात. चकोल्या किंवा गवार ढोकळी किंवा डाळ ढोकली करताना काप करतात, तसेच काप इथं तांदळाच्या पिठाचे करतात. आणि आकाराला थोडे लहान. पायसमपेक्षा अडा पायसम मला जरा अधिक आवडलं. कारण त्याचं प्रिपरेशन एकदमच वेगळं होतं.

हा गोडाचा स्पेल उरकल्यानंतर दोन छोट्या वाट्या आल्या. त्यात एकामध्ये रस्सम होतं. आणि दुसऱ्यात मोरू म्हणजे भरपूर आलं घातलेलं आंबटगोड ताक. आधी रस्सम बरोबर न सर्वात शेवटी मोरूबरोबर थोडा भात घेऊन जेवण संपवा, असं तिथलं वाढपी सांगत होते. मात्र, आम्ही ओव्हरपॅक झालो होतो. पुन्हा नव्यानं भात न घेता शिल्लक ठेवलेला थोडा भात रस्समबरोबर संपविला आणि ताक पिऊन पान स्वच्छ केलं. जेवणाचा शेवटी केळ खाल्लं आणि मगच पानावरून उठलो.

IMG_20150212_132346

सद्या किंवा पारंपरिक केरळी जेवण जेवून आम्ही आडवे व्हायच्या बेतात होतो. तिरुवनंतपुरमला गेल्यानंतर ‘मदर्स व्हेज प्लाझा’ला आवर्जून जा. पण दोन गोष्टी लक्षात ठेवा. भरपूर पदार्थांचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवून जेवा. म्हणजे सर्व पदार्थांचा आस्वाद मनसोक्त घेता येईल. अन्यथा पूर्ण ५० ओव्हर्स न खेळताच तुम्ही आऊट व्हाल. आणि दुसरं म्हणजे मनसोक्त फलंदाजी केल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू जसा फिल्डिंगला उतरायचाच नाही, तसंच तुम्ही करा. अगदी भरपेट जेवल्यानंतर दोन-तीन तास मस्त ताणून द्या. दुनिया इकडची तिकडं होऊ द्या, काय फरक पडत नाही. भरपेट म्हणजे नक्की काय, हे इथं जेवल्यानंतर नक्की समजतं…

तिरुवनंतपुरमचं श्री पद्मनाभस्वामींचं मंदिर सुप्रसिद्ध आहे. भगवान श्रीविष्णू आराम करत पहुडले आहेत. विश्रांती घेताहेत, अशा प्रकारची ती मूर्ती आहे. यासंदर्भात काही कथा आहे किंवा काही कहाणी आहे माहिती नाही. पण भगवान बालाजींची अशी एक कथा सांगितली जाते. की बालाजी इतका श्रीमंत आहे, की आपल्याकडे किती संपती आहे, किती धन आहे, हे मोजता मोजता भगवान बालाजीचा डोळा लागतो आणि धन मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मापावरच भगवान विश्रांती घेतोय, अशी मूर्ती तिरुपतीमध्येच आहे. श्री पद्मनाभस्वामी देखील अस्सल केरळी जेवण जेवून मस्त तृप्त झाले आहेत आणि मस्त विश्रांती घेण्यासाठी आडवे झाले आहेत, ही श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील भगवान विष्णूंच्या आडव्या मूर्तीची कथा म्हणून सहज खपून जाईल.

तेव्हा तिरुवनंतपुरममध्ये गेल्यानंतर श्री पद्मनाभस्वामींचं दर्शन जरूर घ्या. मात्र, ‘मदर्स व्हेज प्लाझा’मध्ये भरपेट भोजनाचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

(श्री पद्मनाभस्वामी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या भोजनाबद्दलची गंमत आणि इतर खादाडी पुढील ब्लॉगमध्ये…)

padmanabhaswami

 

मदर्स व्हेज प्लाझाच्या वेबसाईटला क्लिक करण्यासाठी येथे क्लिक करा…